Wednesday, 22 June 2011

मराठा समाज आणि आरक्षण


दर दोन-चार महिन्यानी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पेपर मधून झळकत असते. आता यावेळी काय तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर एकाही मराठा उमेदवाराला मत देणार नाहीम्हणजे उद्या बिगर मराठा नेते मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील याची ग्यारंटी आहे का? आणि मी म्हणतो आम्हाला आरक्षणाची गरजच काय? आत्तापर्यंत आम्ही स्वतःच्या जातीचा स्वाभिमान बाळगून जगत आलो; आम्ही शिवबाचे वंशज म्हणून मिरवत आलो. आणि त्या विलक्षण श्रीमंत इतिहासाचे, शौर्याचे, पराक्रमाचे बाळकडू आम्हाला मिळाले असताना स्वतःला अविकसित म्हणवून घ्यायचं कारणच काय?हां; आता मराठा समाजातहि काही घटक दुर्बल असतील किंबहुना आहेतच तसे ते इतर सर्व जाती-धर्मात सुध्धा आहेत. अशा दुर्बल घटकांच्या विकासासाठी आर्थिक निकषावर आधारित आरक्षण ठेवायला काहीच हरकत नाही. आणि मराठा समाजातील लोकांनी त्याचा लाभ घेण्यात सुध्धा मला काही वावगे वाटत नाही.पण संपूर्ण मराठा समाजाला जातीनुसार आरक्षण मागणे मला खेदजनक वाटते. अरे ज्या जातीत शिवबा-शंभूराजांसारखे युगपुरुष झाले, ज्या मावळ्यांच्या पराक्रमाने आम्हास वाघिणीचे दुध पाजले त्यांचे वंशज आम्ही नेभळटासारखे आरक्षण काय मागतो.कुठे गेली ती आमच्या मनगटातली ताकद आणि काळ्या कातळाला धडक देण्याची जिद्द. का आपण आपली ताकद लुटूपुटूची पोस्टर युद्धे खेळण्यात वाया घालवतोय? का आपले पराक्रम शौर्य एखादया राजकीय पक्षाच्या वळचणीला गहाण टाकतोय?एक लक्षात ठेवा या आरक्षणाच्या कुबड्या देऊन आपण पुढच्या पिढ्यांना लंगड बनवतोय. त्यांच अंगातल लढण्याच बळच काढून घेतोय; अशान एक दिवस ते आपला लढाऊ बाणाच विसरून जातील. लक्षात ठेवा जाती साठी माती खाण्याची शिकवण देणाऱ्या शिवबा-शंभूराजांना असला नेभळट समाज नक्कीच अपेक्षित नव्हता.त्यामुळ काही करायचच असेल तर प्रगतीच्या आड येणाऱ्या संकटाशी सामना करा; परिस्थिती विरुध्द लढा. गल्लीच्या कोपऱ्यावर कट्ट्यावर बसून आपापसात भांडण्यात काहीच मर्दुमकी नाही. आपल्या इतिहासाला शोभेल आणि पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल अस काही तरी भव्य-दिव्य करण्याची आस मनी बाळगा. आरक्षणाच्या कुबड्या फेकून दया.बोला || जय शिवाजी || जय भवानी || हर हर महादेव ||

Thursday, 26 May 2011

आयला हे फेसबुक म्हणजे लईच काय तरी भारी दिसतंय बाबा....

काय झालंय तुला......?

.........

फेसबुक वर असा का स्टेटस अपडेट केलायस?

.........

मला आता सोनाली ने मेसेज केला तेव्हां कळलं.

.........

काय दुखतंय........पाठ?

........


काय??? आता थोडं बर वाटतय?

........

अरे मग तसं स्टेटस अपडेट कर बाकीच्यांना कसं कळेल?

........

मला वाटलं तुला आणि काय झालं?

........

ठीक आहे...... फोन कट.


माझा मुळचा मुंबईचा आणि आत्ता कामासाठी पुण्यात आलेला रूम पार्टनर, रात्री उशिरा घरी आला. आल आल ते एकदम सिरीअस; कुणाला तरी फोन लावला आणि मग वरचा संवाद.

आयला हे फेसबुक म्हणजे लईच काय तरी भारी दिसतंय बाबा....

आत्ता पर्यंत लई लोकांच्याकडन आईक्ल्याल पण हे एवढं भारी असेल असं वाटलं नव्हत.

आता कुणाची तरी पाठ दुखायला लागलीलय हि बातमीसुध्धा फेसबुकमधी झळकत आसेल; आणि त्यामुळ लोकं तुम्हाला काळजीन फोन करत असतील तर आणि काय पाहिजे? हि म्हणजे एकदम राष्ट्रपतीच्या वरताण अगदी व्ही आय पी ट्रीटमेंट झालं कि राव .....आं....?

चला. आत्ताच्या आत्ता मी पण फेसबुक वर माझ पण फेस बुक करून टाकतोच कसं.

नव्हे हे बघा टाकलच. सर्च तर करून बघा........!!!!


Wednesday, 25 May 2011

‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’?

मागच्याच आठवड्यात दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली कोल्हापुरात खपात 'सकाळ' नंबर वन  लगेच दुसरयाच दिवाशी दै. पुढारीने पण इंडियन रिडरशिप सर्वेचा दाखला देत प्रत्त्युत्तर केलं दुपटीहून अधिक वाचकसंख्येने पुढारीच्या निर्विवाद वर्चस्वावर पुन्हा शिक्का मोर्तब


खरं तर या सगळ्याला सुरवात तशी वर्षा-दीड वर्षापासूनच झालीय. मला वाटतंय पुढारीने जेव्हा पासून पुण्यात पाय रोवायला सुरवात केली, तेव्हापासून या वादाला तोंड फुटत गेलं. कदाचित आपण सगळ्यांनी हे ऑब्सर्व केलच असेल; पुढारीने ज्यावेळी पुणे आवृत्ती चालू केली त्यावेळी त्यांची जाहिरातच काहीशी अशी होती

आता सकाळचं पाहिलं काम पुढारी वाचायचं!!!; पी एम टी च्या अनेक बसेसवर हि जाहीरात त्यावेळी झळकत होती. आता पुढारीने अशी जाहीर कुरापत काढल्यावर सकाळ कसं गप्प बसेल?


त्यांनी मग कोल्हापूर आवृत्तीचे दर बिझनेस पोलीसी च्या नावाखाली कमी केले आणि मग मिडिया वॉर पेटलं; जवळपास आठवडा भर कोल्हापुरात हे धुमशान चालू होतं. पुढारीने विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनचा मुद्दा हाताशी धरून वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेला आपल्या बाजूने केलं; आणि मग काही वृत्तपत्र विक्रेत्यानी दै. सकाळ वर बहिष्कार टाकला.

दै. सकाळने हि मग माघार न घेता वितरणाची समांतर यंत्रणाच उभी केली. प्रथम नाव न घेता होत असलेल्या टीका नंतर वयक्तिक पातळीवर होऊ लागल्या. याचाच परिपाक म्हणून सकाळ कोल्हापूर आवृत्ती चे संपादक पद दस्तूर खुद्द अभिजीत पवारांकडे आले.

त्यांनी हातात कारभार घेतल्या-घेतल्या कोल्हापूरला विकासाच्या पहाटेची स्वप्न दाखवली. पण अजुनहि कोल्हापूरकर पहाटेची स्वप्न खरी होतात या गोष्टीवरच विश्वास ठेवून त्या विकासाची वाट पहात आहेत.

 
वास्तविक पाहता या वादाचा इतिहास फार जुना; मला वाटतं जेव्हा पासून दै. सकाळ न कोल्हापुरात पाय ठेवला तेव्हांपासून या वादाची ठिणगी पडली असावी, त्याच्या अगोदर दै. पुढारीची आणि त्यांच्या परीवाराचीच (सुज्ञ वाचकांना हा टोमणा निश्चितच समाजाला असावा) कोल्हापुरात मोनोपोली होती; त्याला सकाळने दिलेले आव्हान पुढारीला आवडले नसावे त्यामुळेच पुढारीचा पवारद्वेष आणि पर्यायाने राष्ट्रवादी द्वेष जन्माला आला.


पुढे काय झालं माहित नाही; पण साधारण ८-१० दिवसांनी तो वाद बहुधा थंड झाला. लोकांचे फुकट मनोरंजन करण्यापलीकडे यातून काही साध्य झालं असेल असं काही मला वाटत नाही. पण तब्बल एक-दीड वर्षांनी परत ह्या सध्याच्या बातम्यांनी हेच दाखवून दिले कि वाद जरी वरवर थंड झाला असला तरी आत कुठेतरी अजून ठिणगी धुमसते आहे.


आता पुढारी आणि सकाळ यात तुलना करायचीच झाली तर दोन्ही दैनिक वर्तमान पत्रे आहेत (आता सकाळ ने स्वयं घोषित भविष्य पत्राचा उदय केलाय हा भाग सोडून दया) हा एक मुद्दा सोडला तर साम्य असे काही नाहीच.

सकाळ खरे तर ब्राम्हणी ढंगाचे पुणेरी दैनिक; सौम्य भाषेतून आशयपूर्ण आणि सृजनशील लिखाण बुद्धीजीवी लोकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा असलेले; तर पुढारी म्हणजे अस्सल कोल्हापूरी चटपटीत भाषेत लोकांचे मनोरंजन करणारे दैनिक. दोन्ही दैनिकांचा वाचक वर्ग पूर्ण वेगळा पण तरीही त्यांच्या मधील हि इर्षा खरच अनाकलनीय आहे.

जाऊ दे आपल्याला काय करायचाय आपण तरी सकाळ आणि पुढारी दोन्ही पेपर रोज वाचतो तेहि इंटरनेट वर अगदी फुकटात; काय?  

           

Tuesday, 17 May 2011

शीला कि जवानी

गेल्या ५-६ महिन्यात मुन्नी आणि शीला या दोन नावांचा भलताच बोलबाला झाला. मुन्नीची बदनामी आणि शिलाची जवानी दोन्ही अगदी टॉपवर होत्या. त्यामुळ बाकीच काही नसलं तरी आपल्या देशात आम्बट शौकिनांची संख्या किती आहे हे तरी दिसून आलं. मध्यंतरी उत्तर प्रदेशातल्या दोन सख्ख्या बहिणी मुन्नी आणि शीला यांनी आपापली नावच या दोन गाण्यांच्या मूळ बदलून टाकली असही वाचनात आलं होत.

 आता यात किती खर किती खोट देवच जाणे; पण अशी गाणी जन-माणसावर किती परिणाम करतात याचा अनुभव मला नुकताच आला.

मध्यंतरी अस्मादिकांच्या लग्नासाठी आमच्या घरासमोर मांडव घातला होता; आणि मग काय गाणी-बजावणी हेहि आलच. आता मांडव, त्याला लायटिंग, आणि स्टेरिओवर गाणी त्यामुळं दररोज संध्याकाळी गल्लीतली सगळी शेंबडी पोरं आमच्या घरासमोर मांडवात नुसता धुडगूस घालायची. असच एक दिवस संध्याकाळी आमचे वडील पाहुण्यांच्या सोबत गप्पा मारत मांडवात बसले होते; नेहमीप्रमाणे गल्लीतल्या सगळ्या शेंबड्या पोरांनी स्टेरिओवरच्या गाण्यांच्यावर गणपती डान्स चालू केला होता. अशीच २-४ गाणी झाली असतील. सगळेजण त्या लहान पोरांचा निरागस दंगा अगदी कौतुकाने पाहत होते. एवढ्यात काय झाल गर्दीतन ३-४ वर्षांची दोन पोरं आमच्या वडिलांच्या जवळ आली; आणि म्हणतात काशी

अहो काका कसली गाणी लावलाय हि??? शीलाकी जवानी लावा कि जरा .......

आता ह्यास्नी स्वतःची XXX धुवायची अजून अक्कल नाही आणि ह्यास्नी शीलाकी जवानी पाहिजे. ह्याला काय म्हणावं आता तुमीच सांगा.

या प्रसंगाला १०-१२ दिवस झाले असतील नसतील; आमची सुट्टी अजून संपली नसल्यामुळ आम्ही कोल्हापुरातच होतो. आमच्या घरासमोर एक एकत्र कुटुंब आहे.

तिथलाच एक ५-६ वर्षाचा चुणचुणीत मुलगा; एक दिवस घरासमोरच्या रस्त्यावर मोठ-मोठ्यांनी गाणी म्हणत उभा होता

जाने दे शीला...... शीला कि जवानी.... आयम टू सेक्सी फॉर यु.......

एवढ्यात त्याची आई आतून आली आणि असले काय २-३ धप्पाटे त्याच्या पाठीत घातले म्हणता.... ते बिचार लागलं बोंबलायला. मला पण कळेना हेच्या आईला एवढं रागवायला नेमक काय झालं .......

आणि मग थोड्यावेळान लक्षात आलं त्या मुलाच्या आईचं नावच शीला होतं.


Thursday, 12 May 2011

हे आंदोलन-बिंदोलन राहू दे बाजूला आधी लग्न करा


 
मागच्याच आठवड्यात इंग्लंडच्या युवराजाच लग्न अगदी थाटामाटात पार पडलं; आख्खं लंडन रस्त्यावर उतरलं होत. टीवी वर त्या लग्नाच्या बातम्या झळकताना बघून मनांत सारखा एकच प्रश्न घोळत होता; आपल्याला असा दिवस कधी बघायला मिळणार?

आता नाही म्हणलं तरी तुमी आमच्या देशाचे युवराजच. त्यामुळ आमच्या सगळ्या आशा आता तुमच्यावरच आहेत. आमच्या देशाला काँग्रेस शिवाय आणि कॉंग्रेसला तुमच्या शिवाय हाय तरी कोण? आता तुमीच सांगा गेली साठ वर्षे तुमच्या ४-५ पिढ्या या देशावर राज्य करत आहेत; ते काय उगीच? मग भलेही त्याला पार बोफोर्स पासून कालच्या तुमच्या त्या २G पर्यंतची परंपरा असेना का; या देशातील जनता कधी तरी तुमच्या विरुध्द पेटून उठलिय का? हां; आता ४-५ राज्यात दुसऱ्या पक्षाच सरकार येत असेल हि पण केंद्रात तरी तुमाला सध्या तरी काय पर्याय नाही.

काही झाल तरी तुमच्या त्या खट्याळ नाठाळ काँग्रेसजनांना ताळ्यावर आणायला कुणीतरी गांधीच लागतोय. आता हेच बघा कि आम्ही एवढी मोठी मोठी माणस निवडून दिली; मंत्री-बिन्त्री केली पण ती सुध्धा तुमच्या पायताणाजवळ उभारत्यात; न्हव तुमच पायताण हातात घेऊन उभारत्यात. किती राव तुमच मोठ्पण!!
त्यामुळ काय बी होऊदे, तूमी काय बी काळजी करू नका; आमची गांधी घराण्यावरची निष्ठा आजिबात ढळणार नाही; भलेही मग आम्हाला आमच्याच देशात आमचाच तिरंगा फडकवल्या बद्दल गोळ्या खाव्या लागल्या तरी चालतील, किंवा मग महागाईन आमच कंबरड मोडलं तरी हरकत नाही आमचा फक्त आणि फक्त तुमच्यावरच विश्वास आहे.

आता तुमी चाळीशीत पोचला; आमच्या पिढीच एक ठीक आहे पण आमच्या पुढच्या पिढ्यांच आणि भारताचं कसं होणार? त्यावेळी देश चालवायला (नव्हे देशावर राज्य करायला) कुणी गांधी नको का? त्याची सोय आत्ताचं नको का करायला?

म्हणून म्हणतो आता हे आंदोलन-बिंदोलन राहू दे बाजूला स्वत:साठी नाही तरी निदान देशासाठी तरी आधी लग्न करा.

Tuesday, 3 May 2011

प्रेम, त्याग आणि संघर्षाला सलाम

नुकत्याच सकाळच्या मुक्तपीठ सदरातून डॉ. जिग्नेश ब. दोशी यांच्या जिवनावर आधारित प्रसिद्ध झालेली हि कथा.
चं द्रपूर जिल्ह्यातील लहानसे गाव - "कोलगाव.' आदिवासी वैदूच्या झोपडीत एका गोड सडपातळ पाच वर्षीय मुलीने प्रवेश केला. वडिलांच्या सांगण्यावरून टुनकन ती तुटक्‍या खर्चीवर बसली. वैदूबरोबर वडिलांनी मुलीच्या आजाराविषयी चर्चा केली. काही क्षणात वैदूने मुलीला जवळ बोलावले व तिचे हात धरायला लावून गरम त्रिकोणी लोखंडी सळईने पोटावरील सूज आलेल्या भागावर डाग दिला. निरागस मुलगी किंकाळ्या फोडत राहिली. वडिलांनीही तिच्या भल्यासाठी म्हणून मनावर दगड ठेवून ती शांत होईपर्यंत तिचे हात घट्ट धरून ठेवले. ही प्रक्रिया पुढील तीन आठवडे चालली. तिच्या पोटावरील ते व्रण बघून आजपण अंगावर काटा येतो. जन्मत: "सिकल सेल' नावाचा आनुवंशिक आजार असलेली ही सर्वसाधारण परिवारातील मुलगी. वैदूच्या चटक्‍यांपासून सहप्राचार्य डॉ. पूजा दोशी, रसायनशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ इथपर्यंतचा तिचा संघर्षपूर्ण प्रवास समाजापुढे प्रोत्साहनाचे एक उदाहरण आहे.

आज आयसीयूमध्ये मी पुन्हा एकदा तिची मृत्यूशी चाललेली झुंज पाहतो आहे. गेली वीस वर्षे प्रथम मित्र म्हणून व नंतर पती म्हणून तिच्या अशा किती तरी संघर्षपूर्ण दिवसांचा मी साथी व साक्षीदार आहे. "सिकल सेल क्रायसीस'मध्ये रुग्णाला असंख्य सुया टोचल्यासारख्या वेदना होतात व पूर्वस्थितीत येण्याकरिता कमीत कमी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. दहावीच्या वर्षात "क्रायसीस'मुळे तिच्या दोन्ही पायांना "हीप जॉइंट नेक्रोसीस'ने ग्रासले व आजपर्यंत पायाच्या मर्यादित हालचालींवरच ती आपले आयुष्य जगत आहे.

कॉलेजमध्ये प्रथम येणारी मुलगी किती तरी दिवस मधेमधे गायब का होते, हे कोडे उलगडल्यावर प्रतिस्पर्धी असूनसुद्धा मला तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. पुढे मैत्रीण व स्वाभाविकरीत्या माझा लग्नाचा प्रस्ताव; पण तिने स्पष्ट नकार दिला. स्वत:च्या आजारपणामुळे कुणाशीही लग्न करणार नाही, हा तिचा निर्धार मोडण्यास मला तब्बल सहा महिने लागले. बी.एस्सी.च्या प्रथम वर्षातच आमच्या प्रेमाचे फूल उमलले. बी.एस्सी. अंतिम वर्षाला जळगाव जिल्ह्यात उत्तम गुण मिळाल्याने आम्हा दोघांना पुणे विद्यापीठात "बायो केमिस्ट्री' विभागात प्रवेश मिळाला. पहिल्या दिवशी रेल्वेने शिवाजीनगरला उतरलो, तेव्हा मनापासून पुण्यनगरीला नतमस्तक झालो व तितक्‍याच आपुलकीने दोन्ही बाजू पसरवून या विद्येच्या माहेरघराने आम्हाला आपलेसे केले. त्या वेळी त्रास झाला, की मी तिला ससूनमध्ये भरती करायचो. डॉ. मृदुला फडकेंच्या उपचारानंतर पुन्हा अभ्यास सुरू. काही वेळेस न्यूमोनियामुळे परिस्थिती खूप वाईट झाली व रक्त चढवून व जवळ जवळ वीस दिवसांच्या उपचारानंतर ती बरी झाली. आम्हाला रसायनशास्त्र विभागाच्या सर्व शिक्षकांनी खूप प्रोत्साहन व साथ दिली. एक वेळ तर मला नेहमी तिच्या आजारामुळे त्रास होतो या गोष्टीला कंटाळून तिने एम.एस्सी. सोडण्याचा निर्णय घेतला व रेल्वे स्टेशनवरून तिला परत होस्टेलवर घेऊन जाणे मला खूप जड गेले.

लग्नाला घरातून विरोध अपेक्षित होता; पण आतापर्यंत आम्ही सोबत केलेल्या शैक्षणिक प्रगतीमुळे फार थोड्या विरोधानंतर दोन्ही परिवारांच्या आशीर्वादाने आमचे लग्न संपन्न झाले. मला लहान मुले खूप आवडतात व तिला आजारामुळे मूल होणे कठीण! एक दिवस "पापा मे पापा बन गया' हे गाणे बघताना मी ढसाढसा रडलो व ही गोष्ट तिने इतकी मनावर घेतली, की सर्व परिस्थिती माहीत असून मूल पाहिजे म्हणून हट्ट धरला. आठव्या महिन्यात तिला न्यूमोनियाने ग्रासले. परिस्थिती अतिनाजूक (सेप्टिसेमीया) अवस्थेपर्यंत गेली. सीझेरियन करून बाळ वाचले. आयसीयूमध्ये ती मला म्हणाली, "जिग्नेश, हे तुला माझे "गिफ्ट!' आजही ते शब्द माझ्या मनात स्पष्टपणे आठवतात.

डॉ. सरोदे मॅडम (डिन, मेडिकल कॉलेज, नागपूर) व त्यांच्या टीमने खूप प्रयत्न करून तिला वाचवले; पण त्या वेळी तिच्या स्प्लिनवर (स्वादुपिंड) कायमची इजा झाली.

तशी आमची जोडी बऱ्याच बाबतीत विसंगत. मी एक गुजराती नरमदिल; मुंगी मेली तरी उपवास करणारा माणूस व ती आयुष्यभर चटके व त्रास सहन केलेली जिद्दी व कणखर. मला लहानसहान दुखणे असले, की बायकोने दोन शब्द विचारावेत ही अपेक्षा कधीही पूर्ण झाली नाही. असले दुखणे तिच्यासाठी फार क्षुल्लक व त्यामुळे तिचे लक्ष वेधण्यास बराच ड्रामा केल्याशिवाय ती आपल्या कामातून डोके वर करील तर शपथ...!
आता तिने शिक्षण सोडावे व तब्येतीची काळजी घ्यावी, असा माझा मानस होता. पण तिने शिक्षणाआड आजाराला कधीच येऊ दिले नाही. पीएच.डी.च्या (डॉक्‍टरकीच्या) शेवटच्या टप्प्यात लहान मूल व तिला पित्ताशयाच्या खड्यांचा भयंकर त्रास. प्रत्येक आठवड्याला रात्री उशिरा रुग्णवाहिकेच्या आवाजाची शेजाऱ्यांना सवय झाली होती. पीएच.डी.चा शोधनिबंध संपल्यावरच तिने पित्ताशयाचे ऑपरेशन केले. पुढे द्राक्षावर संशोधन करण्यास डीबीटी पोस्ट डॉक्‍टरल शिष्यवृत्ती मिळवली व काळ्या द्राक्षातील डायबेटिसवरील औषधी तत्त्वावर संशोधन केले व ते आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित केले. सर्वांत आनंदाचा क्षण म्हणजे, तिने आतापर्यंत केलेल्या परिश्रमांचे फळ म्हणून तिला आमच्याच रसायनशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ येथे "सहायक प्राचार्य' म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली.

स्वत:च्या नाकावर ऑक्‍सिजनचा मास्क लावून मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या मदतीस धाव घेताना आपण क्वचितच बघतो. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये साधारणत: दहाव्या दिवशी बाजूच्या लहान बाळाची आई रडत आहे, हे बघून तिने मला तिची विचारपूस करण्यास सांगितले. गरीब आई दीड महिन्यापासून बाळाला बरे करण्यासाठी झटत आहे; डॉक्‍टरांचे बिल खूप वाढले आहे, हे कळल्यावर माझ्या हातातले तिच्या औषधासाठी आणलेले 25 हजार रुपये तिने तिला दिले. अशा प्रकारचे किती तरी अनुभव माझ्या स्मरणात आहेत.

आज वीस वर्षे झाली, आम्ही सोबत आहोत; पण अजूनपर्यंत तिच्या आत्मविश्‍वासाची सीमा मला कळली नाही. आज पण तिचे किती तरी नवीन पैलू डोळ्यांसमोर येतात व वाटते अजून तर ती मला अनोळखीच!... प्रेमभरल्या मनाने त्या अनोळखी साथीदाराचे घरात पुन्हा स्वागत करण्यासाठी मी हात पसरून उभा आहे. मला गरज आहे फक्त सर्वांच्या शुभेच्छांची...!!

Wednesday, 27 April 2011

पोलीस खात्याच्या आयचा घो.

(सविस्तर बातमी वाचण्यासाठी शेजारील चित्रावर क्लिक करा)

आता काय बोलणार? जरा तर काय जनाची नाही तर
मनाची? लोक बोलतात ते काय उगीच नाही. हेंची गुणच असली. आता महाराष्ट्र आणि बिहार मध्ये काय फरक उरला म्हणायचा?
खुद्द राज्याच्या गृह राज्य मंत्र्यांच्या गावात हि अवस्था....

आता खरी कसोटी आहे ती आपल्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेची.
पाहूया काय होतंय ते.
पोलीस खात्याचा कहर

Friday, 22 April 2011

हेंच असं आसतय बघा.

आज कालच्या पोरींचा काय नेम नाही. ह्या कुठ कधी कशा वागतील हेचा भरवसा हेंच्या आई-बापालाच काय पण प्रत्यक्षात ब्रह्मदेवाच्या बाला सुध्धा देता येणार नाही.

आता आमच्या झंप्यादाचच घ्या. हेचा आज्जा कोकणातन येऊन घाटावर स्थायिक झालेला. बा हेच्या लहानपणीच गेला. तवापासनं आईनंच काय-बाय काम करून टुकीन संसार चालवला. झंप्यादा बारावी पास झाला तसा थोरा मोठ्यांच्या हाता-पाया पडून एका कॉलेजात शिपाई म्हणून चिकटवला. झंप्यादा मुळचा कोकणातला असल्यामुळ गोरा-गोमटा. शाळेला असल्यापासन गल्लीतच २-३ प्रकरण झालेली. पण गल्लीवाल्यास्नी घराची परिस्थिती माहिती असल्यामुळं पुढ काय डाळ शिजली नाही.


मात्र कॉलेजात लागल्यापास्न झंप्यादाच्या ह्या कला-गुणांना नव्यान वाव मिळाला. आणि कॉलेजची घंटा बडवता-बडवता हेच्या दिलाची घंटी पुन्हा नव्यान वाजली. पोरगी चांगल्या घरातली दिसायला नेटकी आणि वागायला मॉड. झंप्यादान् मग आपला सगळा अनुभव पणाला लावला आणि रोज काहीतरी नवीन क्लुप्त्या काढून पोरगिला चांगलच इंप्रेस केलं. झंप्यादाचा ह्यो पराक्रम बघून दोस्त मंडळी तोंडात बोट घालायची.


झाल ज्युनिअर संपवून पोरगी सिनिअरला परत त्याच कॉलेजात आली; २-३ वर्ष कॉलेजात हि जोडी चांगलीच गाजली. शेवटच्या वर्षी मात्र हे प्रकरण पोरीच्या घरापर्यंत पोहोचलं. पोरगी लगीन करीन तर हेच्यासंगच म्हणून हट्टून बसली. पण पोरीच्या घरच्या तालेवार मंडळीना शिपाई जावई कसा चालणार?. तेनी हर तऱ्हेन पोरीची समजूत काढली आणि परीक्षा होईपर्यंत आईच्या कडक पहारयाखाली पोरीच कॉलेज कसं-बस् पार पडलं. परीक्षा झाली तशी पोरीची रवानगी नागावंला थेट तिच्या चुलत्याकड केली. चुलता एकदम कडक तेच्या धाकाखाली पोरगी ८-१० दिवस एकदम शहाण्या सारखी वागू लागली. घरच्यांचा जीव भांड्यात पडला. तेनी पोरीसाठी १-२ तोलामोलाच्या ठिकाणी बोलणी चालू केली. पण इकडं पोरीच्या मनान परत पलटी खाल्ली; तीन् मैत्रिणीला फोन करण्याच्या नावाखाली परत झंप्यादाला contact केला. मग काय विझत आलेल्या विस्तवाला हवेची फुंकर लागली  आणि झंप्यादाच्या मनातली आग चांगलीच पेटली.


पोरगी घरी वरवरणतरी एकदम नॉर्मल वागायची; त्यामुळं घरचे पण निश्चिंत झालेले. अशातच पोरीच्या सुपीक डोक्यातन प्लान निघाला; आणि चुलत बहिणींच्या बरोबर कोल्हापुरात फिरायला जायची परवानगी काढली. घराच्यानी पण विचार केला पोरगी आता शहाणी झालीय; बरेच दिवस घरात बसून कंटाळली असेल; जाऊन येऊ दे एकदा; जवळच तर हाय.


झालं. पोरीन झंप्यादाला सांगितलं शेवटाचा चान्स आहे; काय करायचं असलं तर आत्ताच कर; नाही तर मला विसरून जा झंप्यादा लागला कामाला विश्वासातली २-३ दोस्त मांडळी गोळा केली. सगळ्यांनी मिळून प्लान बनवला. कुणी-कुणी काय काय करायचं ते बी ठरवल. एक मारुती ओमनी ठरवली. झाली सगळी तयारी. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी पोरगी तिच्या दोन चुलत बहिणींच्या बरोबर कोल्हापूरला जाणार होती. तिथूनच तिला उचलायची असं ठरलं.


दुसऱ्यादिवशी सकाळीच झंप्यादा कोल्हापुरात जाऊन पोचला, ठरलेला स्पॉट नजरेखालून घातला. दोन पोर पुढ नरसोबाच्या वाडीला पाठवून दिली; सगळी तयारी करायला. सांच्याला ठरल्याप्रमाण पोरगी आपल्या बहिणींबरोबर खास्बागेच्या शेजारी राजाभाऊची भेळ खायला आली. आणि झंप्यादान् मोका साधला. पोरीच्या बहिणी भेळ खाण्यात दंग असतानाच पोरगिला अलगद ओम्नीत ढकलली आणि नरसोबाच्या वाडीच्या दिशेन धूम ठोकली. इकडं पोरीच्या बहिणींनी दंगा चालू केला; पब्लिक जमा झाल; कुणीतरी जुना राजवाडा पोलिसांना बोलावलं.


पोलीसबी कधी नाही ते वेळेवर आले. त्यांना गर्दीतल्या कुणीतरी गाडीचा नंबर सांगितला.
RTO ऑफिस मधून गाडीवाल्याचा नंबर मिळवला. त्याला कॉल करून विचारलं तर त्येन मी त्या गावचाच नाही असं दाखवलं; म्हणाला मी भाड घेऊन पुण्याला आलोय. पोलिसांनी खात्री करायला परत मोबाईल कंपनीत चौकशी केली; कंपनीच्या जी.पी.एस. सिस्टीम वर मोबाईल पुण्यात नसून कुरुंदवाड परिसरात असल्याच दिसत होतं.


पोलिसांच्या अनुभवी नजरेला झाला प्रकार लागलीच समजला. तेनी मोर्चा थेट नरसोबाच्या वाडीकड वळवला. वाडीच्या देवळाच्या बाहेरच पार्किंग मध्ये ती ओमनी लावलेली पोलिसांना दिसली. त्यांनी शिताफीन गाडीवाल्याला ताब्यात घेतला. मग गाडीवाल्यानच पोलिसांना झंप्यादा आणि पोरीजवळ न्हेलं. पोलीस तिथं पोहोचे पर्यंत हेंचा शेवटचा फेरा चालला होता. पोलिसांना बघताच झंप्यादान शेवटचा फेरा पळतच पार केला आणि शेवटी शुभमंगल पार पडलं.


पोलिसांनी तरीबी झंप्यादाला ताब्यात घेतला आणि चांगल्या २-४ ठेऊन दिल्या. पण आता आपलं कोण काय वाकड करणार हाय? अशा अविर्भावात झंप्यादा निवांत होता.  झंप्यादाची आणि पोरीची वरात परत कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याकड  निघाली. तिथं आणल्यावार परत एकदा झंप्यादाची चांगली आरती झाली. तवर पोरीच आई-बा बी पोलीस ठाण्यात आलं. पोरीच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या बगून तिच्या आईन आख्ख पोलीस ठाण डोक्यावर घेतल; रडून-आरडून गोंधळ घातला, भिंतीवर डोस्क आपटून घेतल आणि शेवटी बेशुद्ध पडली.


आपल्या आई-बाची अशी अवस्था बघून; पोरगी मनातन चपापली. आणि परत एकदा तिच्या मनान् पलटी खाल्ली. पोरगी धावत जाऊन आई-बाच्या गळ्यात पडली; म्हणाली;
आई-बाबा मी चुकले; भावनेच्या भरात मी असं वागले मला माफ करा; मी आता तुमच्या बरोबरच येणार

(च्या मायला मी हिच्या भावनेच्या); आतापर्यंत पोरीवर भरवसा ठेवून निवांत बसलेल्या झंप्यादावर मात्र आता बोम्ब मारायची पाळी आली, तेन आता स्वत:च्याच थोबाडात हाणून घ्यायला सुरवात केली. पोलिसांनी तेला आतल्या खोलीत न्हेला. आणि पोरी कडच्या तालेवार मंडळी बरोबर प्रकरण नेहमीप्रमाणे मिटवून टाकल. पोरगी आई-बा बरोबर निघून गेल्यावर; झंप्यादाला ग्लासभर थंडगार पाणी पाजलं आणि समज देऊन सोडून दिलं.


सगळीकडन् मार खाऊन आलेल्या झंप्यादाला आता कुणाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. मंडळी आता तुमीच सांगा ह्यात आता आमच्या झंप्यादाची काय चूक?
तेन् आता काय करायचं? कुठ जायचं? कुणाच्या तोंडाकड बघायचं?
का असच लोंबकळत फिरायच आयुष्यभर?

(सुज्ञ वाचकांना माझी उचलेगिरी समजली असेलच. कोल्हापूर परिसरात नुकत्याच घडलेल्या एका घटनेचे हे ब्लॉग पोस्ट मध्ये रुपांतर)

Friday, 25 February 2011

खाकी वर्दीची मिजास

खाकी वर्दीच्या माजोरीपणाचा अनुभव आपल्या सगळ्यांना एकदा तरी आलेला असतोच; त्यात तुमची चूक असो वा नसो. आणि मग तुमच्या माझ्यासारख्या पांढरपेशा माणसाला मूग गिळून गप्प बसण्याशिवाय काहीच मार्ग राहत नाही. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या खात्याच्या हातात आपला समाज किती सुरक्षित आहे हे आपण सगळे जाणतोच. आजची आपली अवस्था भीक नको पण कुत्र आवर यापेक्षा काहि वेगळी नाहीच. त्यामुळ मदत राहू दे बाजूला पण यांचा त्रास नको अशीच आपली एकंदरीत मानसिकता झाली आहे.

माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले. मध्यंतरी एकदा आम्ही पाच-सहा जण मित्र विमाननगर मध्ये पार्टीवरून परत येत होतो. रात्री ११-११:३० ची वेळ रमत-गमत गप्पा टप्पा करत आमचं टोळक रस्त्याच्या बाजूने चालल होतं. (आमच्यातल्या कुणीही कसलीही नशा केली नव्हती, सर्वजण अगदी पूर्ण भानावर होते)

इतक्यात विमाननगर, कल्याणीनगर भागात फिरणारी QRT (Quick Response Troup)ची गाडी सगळा रस्ता मोकळा असताना पाठीमागून येऊन आम्हाला चिकटली; आणि त्यातला एक पोलीस आम्हाला म्हणतो कसा काय रे भडव्यानो; तुमच्या XXXजवळ गाडी आली तरी तुम्हाला शुद्ध नाही का? शुद्धीवरती आणायला लागतय काय तुमाला?
हे ऐकून आमच्यातले जे शहाणे-सुरते होते ते गपगुमान पुढ सटकले; पण एकजण जरा गरम डोक्याचा होता तो त्यांना खुन्नस देत तिथच उभा राहिला. यावर गाडीतला एकजण म्हणाला बघतोस काय रे भडव्या? माज आलाय काय तुला? ह्याला घ्या रे आत. मग मात्र मी मध्यस्थी केली, म्हणालो माफ करा साहेब; चूक झाली. इथच बाहेर जेवायला गेलो होतो. जरा उशीर झाला

यावर गाडीतनं आवाज आला ठीकाय ठीकाय; मित्राला चड्डीत रहायला शिकव; नाहीतर चड्डी फाटेस्तोवर मार खाईल एक दिवस”  मी जरा निरखून बघितला तर गाडीत फ्रंटसीटवर बसलेला तो PSI किंवा हवालदार जो कुणी होता तो चक्क दारू पिऊन झिंगत होता. मी मनात म्हटलं “XXXच्यानो कोरेगाव पार्कात तुमच्या XXXखाली बॉम्ब स्फोट झाले तरी तुमच्या खात्याला पत्ता लागला नाही आणि आमच्या सारखी सुशिक्षित पांढरपेशी माणस दिसली म्हणून लगेच मिजास कराय लागलाय काय?

ह्या गोष्टीला ५-६ महिने उलटून गेले असतील तेवढ्यात परवाच आणखीन एक किस्सा घडला. एक महत्वाच्या कामासाठी मी २-४ दिवस सुट्टी टाकून कोल्हापूरला गेलो होतो. तारीख होती १७ फेब्रुवारी; वेळ साधारण दुपारी ११:३०-१२ ची असेल. मी बिंदू चौकातून पुढे मिरजकर तिकटीच्या दिशेने माझ्या बाईक वरून चाललो होतो.

एवढ्यात मला लांबून सायरन ऐकू आला, मला वाटलं कि एखादी अम्ब्युलंस वगैरे असेल म्हणून, आधीच कोल्हापुरातले जगप्रसिध्द रस्ते (कोल्हापूरी भाषेतच सांगायचं झालं तर इथल्या आमदार खासदारानी आणि महानगरपालिकेन IRB वाल्यांच्या मदतीन कोल्हापूरकरास्नी २२० कोटी रुपयांचा घोडा लावलाय) त्यात गर्दीची वेळ. पण संधी मिळताच मी सायरनवाल्या गाडीला वाट करून दिली. बघतोय तर काय एक पोलीस गाडी.
गाडी जवळपास फर्लांगभर पुढ गेल्यावर मी माझी बाईक परत रस्त्यावर घेतली, तसे मागून २-३ मोठे हॉर्न, पुढे गेलेल्या पोलीस गाडीतून तो हवालदार मोठ-मोठ्यान बोंबलाय लागला; मला म्हणाला
“ए माकडा, पाठीमाग दिसत नाही का तुला? (हेच्या बान् माणसाला पाठीमाग डोळ ठेवल्यात......)

मी माझी बाईक झटदिशी साईडला घेतली; तर पाठीमागून एक मंत्री महोदय Ambassador गाडीतून अगदी राजाच्या आवेशात चालले होते. मी जरा निरखून बघितले; गाडीचा नंबर होता MH-09 8989. आता ते असे कुठे दिल्लीवर स्वारी करायला चालले होते कुणास ठाऊक कि आपल्याला मंत्रीपदी बसवणारी हि रस्त्यावरची जनताच आहे; याचाही त्यांना विसार पडावा?.

त्यांची गाडी पुढे जाऊन परत गर्दीत अडकली; यावेळी बिचाऱ्या २-३ रिक्षावाल्यांनी त्या पुढे चाललेल्या पोलीस गाडीतल्या हवालदाराकडून स्वता:च्या आया-बहिणींचा अस्सल कोल्हापूरी भाषेत उद्धार करवून घेतला. आता मंत्र्याच्या गाडी पुढे आपली वाहने आणू नयेत असा कुठे कायदा आहे का? आणि २-५ मिनिट उशीर झाला मंत्री साहेबाना तर असा काय फरक पडणार आहे? आयला ह्या XXXच्यानी संसदेच सगळं अधिवेशन टाईमपास करण्यात घालवल; शेकडो कोटी रुपयांचा चुराडा केला; त्यावेळी कुठे गेले होते हे पोलीस?

हे सगळ बघून माझ डोक जम सटकल; वाटल रस्त्यावरचा दगड उचलून त्या रांडच्या पोलिसाला एक टीप्पिर्र्यात गार करावा. आयला साहेब पेक्षा शिपायाचीच मिजास जास्त.
पण करणार काय? गर्दीपुढ आणि वर्दिपुढ कुणाच काय चाललय का? झालेल्या अपमानामुळ मनातल्या मनातचं चरफडत त्या हवालदाराची आई-बहिण एक केली आणि गप्प बसलो.

दोन-तीन दिवस झाले आणि तेवढ्यात दैनिक पुढारी मध्ये खाली दिलेली बातमी वाचली. मग म्हटलं चला आता यावर एक पोस्ट लिहूनच टाकू. तसही प्रापंचिक लडतरीतून आपल्या ब्लॉगकड आपलं बरच दुर्लक्ष झालय. आयता विषय मिळालाय मनातला सल बाहेर काढायला कशाला सोडा?


Friday, 4 February 2011

थोडसं विषयांतर........

मित्रानो ब्लॉग लिहायला चालू करुन आज जवळपास एक महिना झाला. जवळपास डझनभर पोस्ट लिहून झाले. आणि त्याना तुम्हासगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. साधारण ४०० व्हीजीटर्स आणि १००० भर पेज व्हीव्युज ही माझी आत्तापर्यंतची कमाई. आपलं प्रेम असच रहाव आणि माझ्याकडून आपल्याला आवडेल असं अजून चांगल काहीतरी लिहील जाव हिच इच्छा.
ब्लॉगिंग मध्ये मी तसा अजून 'बच्चाच' आहे; त्यामुळ आपण जे काही लिहितोय ते खरच लोकांना आवडेल का? रुचेल का? हा प्रश्न मला नेहमी पडत असतो. फक्त लोकांच्या वाचनाची भूक भागवणार काहीही त्यांना वरचेवर द्याव कि खरोखरच अस्सल-अस्सल असेल तेवढच त्यांना द्याव हा प्रश्न मला बऱ्याचदा पडतो.

आता आपल्यापेक्षा ह्या प्रश्नांची उत्तरं आणखीन कोण देऊ शकेल? म्हणूनच मला आपली थोडी मदत हवीय. आपण फक्त एवढंच करायचं कि आत्ता पर्यंत मी ज्या काही ११-१२ पोस्ट लिहिल्यात त्यापैकी आपल्याला सगळ्यात जास्त आवडलेली आणि सगळ्यात जास्त न आवडलेली पोस्ट कोणती हे फक्त कमेंट लिहून मला सांगायचं.

प्लीज कराल ना एवढं?

Thursday, 3 February 2011

‘ती’ची आठवण

आज पुन्हा एकदा लाईट गेली, नेहमीसारखीचं. मग अंधारात एकाकीपणच मनाची सोबत करू लागलं. बेड शेजारच्या खिडकीतून दिसणार आकाश आणि त्यात बरोबर खिडकी समोरच दिसणार मृग नक्षत्र आताशा ओळखीचं, आपलंस वाटू लागलेलं. पण का कुणास ठाऊक ते देखील आज उदासवाण वाटत होतं. आकाशातील लुकलुकणाऱ्या चांदण्या जणू काही एकमेकाशी बोलतायत असंच मला नेहमी वाटायचं; पण त्यादेखील आज एकमेकींशी अबोला धरल्यासारख्या वागत होत्या.

विचार करता करता मन कधी भूतकाळात शिरलं आणि आठवणींच्या लाटांवर हिंदकळू लागलं कळलंच नाही. काही सुखद काही कटू; अनेक आठवणी आल्या अन् गेल्या; पण....? पण तीची आठवण? तीची आठवण घेऊन जातेय मला माझ्यापासूनच दूर; खूप-खूप दूर. शेवटी तीचीच आठवण ती; मनाला हुरहूर लावल्याशिवाय जाईलच कशी?

.........पण शेवटी मी असा कोणता गुन्हा केलाय; ज्याची एवढी कठोर शिक्षा देतोय देव मला? शेवटी ती माझी कधीच होऊ शकणार नाही का? का पण का? एखाद्या व्यक्तीवर आपण इतकं प्रेम कराव आणि तिला याच काहीच नसाव? दैव देखील किती वाईट असतं ना? हळव्या मनावरच ते अमानुष, असह्य प्रहार करत सुटत.

.........पण आजच मी इतका हळवा का झालोय? वातावरणाचा परिणाम असावा बहुतेक.

आता उद्या सकाळी पुन्हा दुसर मन पुन्हा या पहिल्या हळव्या मनावर दादागिरी करू लागेल, आणि रात्रीच्या अंधारात, आठवणींच्या कुशीत शिरलेल्या पहिल्या मनाला वेड्यात काढेल.

........पण ते खरं असेल? हे दुसर मन...? ते खरच तिच्यावर प्रेम करत नाही? मग दिवसादेखील नकळत वाट चुकल्यासारखं तिच्या आठवणींच्या मागे पळणारं ते मन कोणत? पाहिलं कि दुसर?

.......खूप काही लिहायचय; पण विसरून गेलोय, तिच्या आठवणींच्या नादात, शेवटी ती म्हणजे एक विषय आहे कधीही न संपणारा किंवा एक कोडं कधीही न सुटणारं!!!

Wednesday, 2 February 2011

हि कधी सुधरतील का?

मध्ये कधी तरी ओबामा का जॉर्ज-बुश यापैकी कुणीतरी म्हणाल्याच आठवतय; कि साऊथ इंडियन माणसं हि जगातली सगळ्यात हुशार जमात आहे म्हणून. त्यावरून माझा तरी असा ग्रह झालाय कि बहुधा सगळी हुशार साऊथ इंडियन आण्णा लोक फक्त अमेरिकेतच गेली असावीत कारण आता जी काही इथं भारतात शिल्लक राहिली आहेत किंवा इतरत्र गेली आहेत त्यांच्याकड बघून तरी असं काही तरी म्हणणारयाचीच बुद्धी भ्रष्ट झाली का काय असं वाटाय लागत.

कारण बुद्धीमत्ता तर सोडाच या लोकांच्याकड साधा कॉमन सेन्स नावाचा काही भाग आहे का नाही असा कधी कधी प्रश्न पडतो. असाच एक आण्णा आमच्या कंपनीत नवीनच जॉईन झालता. डोळ्यावर सोडा वॉटरचा चष्मा, डोक्यावर एकबी केस नाही, तोंडातल फर्निचर सदोदित बाहेर आणि यावर कडी म्हणजे कुनीबी भेटू दे उगीचच हसून कहो भाई केसे हुं? म्हणणार (अरे XXXच्या तुला हिंदी येत नसल तर बोलू नको; पण आमच्या कानावर बलात्कार का?) बाकी ह्या लोकांना हिंदीचा कळवळा फक्त इथं आल्यावरच येत असतो आणि ते बी कुणी नवीन ओळखीचा आणि तेच्या फायद्याचा असला तरच. इतरवेळी चार आण्णा एकत्र येऊदेत; नाही तुमच्या कानाची काशी झाली तर नाव नाही सांगणार. आपल्यात कुणीतरी दुसरा माणूस आहे त्याचा विचारच येणार नाही हेंच्या मनात. हेंच आपलं क्याड-म्याड क्याड-म्याड चालूच.

तर असा तो आण्णा. नवीनच होता माझी काय ओळख-बिळख नव्हती. पण ध्यानच असलं कि शंभर माणसात उठून दिसलं. असाच एक दिवशी कंपनीच्या मेस मध्ये जेवायला गेलतो. पण बसायला जागाच न्हवती लांबून बघीतल तर एका कोपरयात आण्णा बसला होता आणि दोन खुर्च्या रिकाम्या; मी पळत जाऊन एक खुर्ची पकडली आणि मुद्दामच दुसरीकड बघून जेवायला लागलो म्हटलं हेच्या नादाला लागून डोक पिकवून घ्यायला नको. तेवढ्यात एक फॉरीनर जागा शोधत शोधत तिथं आला आणि आण्णाला उद्देशून म्हनला “Can I sit here?” तर हे म्हणतय कसं “NO NO !! no one is sitting here; you can sit.

आता हेचं “NO NO” ऐकूनच तो फॉरीनर चार पावलं लांब गेलता; तिथन त्यो बिचारा परत आला. आणि शेजारच्या खुर्चीवर बसला. आता फॉरीनर शेजारी बसला म्हणल्यावर हे आण्णा एवढ चेकाळल म्हणता; काय बोलायची सोय नाही. मग तेला नाव काय? गाव काय? राहतोस कुठ? खातोस कुठ? शिकलास काय? काय बी विचारत सुटल. आधीच ते बिचार इथल्या गर्मिला आणि गर्दीला वैतागलेल. त्यात ह्या आण्णान हाईटच केली त्या फॉरीनरला सरळ सरळ विचारल “Are you married or do you have GF?” त्या फॉरीनरन तोंड वाकड केलं “Excuse Me!!” म्हणला आणि गप् उठून गेला. तरीबी ह्या आण्णाला काय नाहीच हे आपलं दात काढून हसतयचं.

हेंच्या सो कोल्ड अनुभवाचा आणि हेंच्या कामाच्या दर्जाचा मला कधी दुरान्वयेही संबंध दिसला नाही. काम चालू व्हायच्या आधी हेंच्या गप्पा काय ऐकाव्यात; आणि नुसतं काम चालू व्हायचा आवकाश हेंनी शेपूट घातलीच म्हणून समजा. असं कितीतरी वेळा अनुभवलय मी. फारच काय झालं तर सिक लिव्ह टाकून निवांत सुट्टीवर जाणार ४-८ दिवस; मग काम गेल बोंबलत. त्यामुळ कुणाचाबी साउथ कडचा कुठला बी सिवी-बीवी दिसला तर मी दहादा विचार करतो.

मी ऑन-साईट ला असतानाचा किस्सा एकदा आमची क्लायंट आमच्या ग्रुप बरोबर गप्पा मारत होती त्यात आमचा तो मगाचा आण्णा सुध्धा होता, बोलता बोलता सेक्स वर विषय आला. आमची क्लायंट म्हणाली “Here Everyone does it at the age of 16!!” त्यावर आमचा आण्णा म्हणतो कसा “But I am still virgin!!! आमच्या क्लायंटचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालता. (आता ह्यो virgin आहे हे क्लायंटला सांगण्यापाठीमागचा ह्याचा उद्देश खरच देव जाणे!!)

बाकी ह्या लोकांच्या एवढी झिंग जमात जगाच्या पाठीवर कुठ नसल; ऑन-साईट ला जायला अगदी जीव जातोय हेंचा; आण्णा-आण्णा लोक एकमेकाला एकदम सामील; (कलर वरनच एकमेकाला ओळखणार; आणि मग लगेच दोस्त); वळखी-बिळखी काढून लाख लडतरी करून नंबर लावणार आणि एकदा का ऑन-साईटला गेली परतायच नाव काढणार नाहीत, एकदम क्लायंटला चिकटूनच बसणार; बॉसची चाटूगिरी करणार काय बी करणार पण काहि झालं तरी एक ५-६ वर्ष तरी परत यायचं नाव काढणार नाहीत. दररोज आपला भात शिजवणार आणि तेच खाऊन दिवस काढणार.

ऑन-साईटला असतानाच एक दिवस मला आमच्या क्लायंटन बोलवून सांगितलं कि नेक्स्ट मंथ तू परत जाऊ शकतोस; इथल काम संपलय. मी परत यायला मिळणार म्हणून खुश झालतो. आता नेहमीप्रमाणे कान टवकारून बसलेल्या ह्या आण्णाला हि गोष्ट लगेच समजली; तेन मला अगदी सिरीयसली जवळ बोलावलं; म्हणाला हे बघ! तू काय जास्त दिवस इथं राहिलेला नाहीस, त्यामुळ जास्त काय सेविंग केल नसशील; आता इथून पुढ फक्त रूमवरच राहत जा कुठ बाहेर-बिहेर जायच्या भानगडीत पडू नकोस.पोर म्हणतील इकडं जाऊ तीकड जाऊ; आपण आपलं काय तरी कारण सांगायचं आणि रूमवरच राहायचं; पैसे सेव कर

मी मनात म्हटलं बाबा इथच भेटलास; परत तीकड भेटू नकोस (भारतात). आता मला सांगा मंडळी तुमच्या-माझ्यासारखा एखादा असता तर त्यो काय म्हणाला असता अरे शेवटचे थोडेच दिवस राहिलेत; काय बघायचं राहील असेल तर बघून घे; मजा कर!! परत परत काय थोडाच येणार आहेस इथं? पण मग आण्णा तो कसला? आपल्याला काय तेंच्या सारख झेपणार हाय थोडच?.

असो; आता तुम्ही म्हणशीला बस झाली मापं काढन; सगळी आण्णा काय तशीच असत्यात काय? तुमच पण बरोबर हाय ओ; सगळीच आण्णा तशी असत्यात आणि आपली सगळीच माणस शहाणी असत्यात असं काय नाही पण आण्णा लोकांच्यात हे प्रमाण जरा जास्त. म्हणजे १००-१५० टक्के एवढचं.

Thursday, 27 January 2011

आयडिया केली ......

मार्च-एप्रिलचे दिवस होते. दिवसाचा उन्हाचा तडाखा सहन होत नव्हता आणि रात्रीच मरणाच उकाडायच. भरीस-भर म्हणून सरकारच्या कृपेन लोड शेडींगमूळ गावात १२-१२ तास लाईटच नसायची. मग कसला फ्यान अन् कसलं काय. निम्म गाव अंगणात झोपायच.

पण चौगले गल्लीतलं दादयाच घर तस जरा गचडीतच हुत; आजूबाजूला सगळी भावकितलीच घर चिकटून चिकटून बांधलेली; त्यामुळ गल्ली सुध्धा चिंचोळीच झालेली आणि त्यात कुणाच्या गाड्या; कुणाचा ट्रक्टर यामुळ रस्त्यावरन सप्पय चालायची बोंब मग झोपायच तर लांबच. दादयान मनातल्या मनात सगळ्या भावकीचा उद्धार केला आणि विचार करू लागला आयला यातन मार्ग काय काढावा?

असा विचार करत करत दादया गल्लीच्या कोपऱ्याला आला तसा तिथं त्याचा दोस्त संप्या  गाठ पडला. दादयान त्याला आपलं दुखण सांगितलं; दोस्तान दोन मिनिट विचार केल्यागत केलं आणि म्हणला एक आयडिया हाय; आपण आस करू तुमच्या गल्लीतली दोन-चार पोर गोळा कर आपण तळ्याकाठच्या देवळात झोपायला चालू करू आजपास्न!! तसपण लोड-शेडींगमूळ आता म्हाताऱ्यांची भजन-बिजन सगळी बंद झाल्यात; आपल्याला रान मोकळच हाय आता.

दादयाला आयडिया एकदम पसंत पडली. दादयान लगीच गल्लीतली २-४ पोर तयार केली आणि वळकटी-बिळकटी घेऊन देवळात झोपायला जायला चालू केलं. हळू-हळू आयडिया हिट झाली आणि जवळ जवळ आठ-दहा पोर झोपायला यायला चालू झाली.

तळ्याकाठच खंडोबाच देऊळ म्हणजे सगळ्या गावच श्रद्धास्थान एकदम जुनं, आणि प्रशस्त अलीकडच गावकऱ्यांनी देवळाचा जीर्णोध्धार केलता, सभामंडप चारी बाजून बंदिस्त करून ग्रील मारून घेतल होत; त्यामुळ दादयाची आणि दोस्त मंडळींची चांगलीच सोय झाली होती. रात्रीच तळ्यावरन येणाऱ्या गार वाऱ्याला पडायला भलतीच मजा यायची.

असेच १०-१२ दिवस गेले आणि एक नवीनच त्रास चालू झाला. सगळी झोपली कि हिकड-तीकड हिंडणारी ३-४ कुत्री हळूच येऊन अंथरुणात शिरायची आणि उबिला पडून राहायची.
झोपत कुणाचा हात पाय पडला कि कुंई-कुंई करत बसायची; आयला नसता डोक्याला ताप. मग उठायचं आणि सगळी कुत्री हाकलून काढायची पण झोपेच खोबरं व्हायच ते व्हायचंच.

काय करायचं काय करायचं असा विचार करण्यात दोन दिवस गेले, आता कुत्र्यांची संख्या पण वाढली होती. पण आमचा दादया म्हणजे कसला माणूस? तेच्या सुपीक डोक्यातन एक आयडिया निघालीच. दादयान पोर गोळा केली; म्हणला च्यामायला मी ह्या कुत्र्यांच्या!! निकालच लावून टाकूया आज

नेहमीप्रमाण सांच्यालाच पोर देवळात गोळा झाली, गप्पा-टप्पा आणि गावाची मापं काढून झाल्यावर अंथरून टाकली आणि जेवायला गेली. नेहमी पोर जेवायला गेली कि कुत्री एक एक करून अंथरुणात शिरून बसलेली असायची.

पण त्यादिवशी परत येताना दादयान सांगितल्याप्रमाण पोरं तयारीन आलती, प्रत्येकजण येताना टोणे, काठ्या घेऊन आलता. सगळीजण देवळाबाहेर जमल्यावर मग कुत्र्यांच्यावर एकदम हल्ला करायचं ठरलं. त्या बेतान एक एक जण आवाज न करता हळूच आत शिरला, एकान पुढ जाऊन गाभाऱ्याचा दरवाजा बंद करून घेतला. एक जण हातात टोना घेऊन सभामंडपाच्या दारात उभा राहीला आणि बाकीचे तिघे चौघे जण आत आपापली पोझिशन घेऊन उभे राहिले. दादया सगळ्यांचा म्होरक्या; तावा-तावान गेला पुढ आणि अंथरुणात शिरलेल्या एक कुत्र्याच्या पेकाटात एक रट्टा हाणला तस कुत्र जिवाच्या आकांतान केकाटत दरवाज्याकड पळाल; पण तिथ एक जण अगोदर तयार हुताच; तेन काय त्या कुत्र्याला बाहेर जाऊ दिलं नाही. आणि मग एक एक करून सगळ्या कुत्र्यांची तीच अवस्था झाली.
केकाटनारी कुत्री आणि चेव चढलेले हे ५-६ जण शूर-वीर; देवळात नुसता हैदोस चालला होता. आधीच सगळीकडे अंधार त्यात कुणाचा कुणाला पत्ता नाही. नुसती झोडपा-झोडपी. कुत्र भिऊन कोपर्यात जाऊन उभ राहील कि दादया शोधत शोधत जाऊन तेला मधी आणायचा आणि मग परत सगळ्यांनी मिळून तेला झोडपायच असा हा जंगी कार्यक्रम चांगली १०-१५ मिनिट चालला होता. शेवटी मारून मारून दादयाचे हात भरून आले तसा दादयान दोस्ताना इशारा केला आणि पाप बिचारया कुत्र्यांची सुटका झाली.

हाश्श-हुश्श करून दादया अंथरुणात टेकला..... एवढ्यात तेच्या हाताला ओल-ओल कायतरी लागल; दादया हात नाकाजवळ नेत वरडला आरं XXXच्यानो; हे काय हाय ......?   

सगळ्यांची अंथरुण भरून गेल्याली; देवळात बी सगळीकड चिकट चिकट लागतेलं. सगळी गप्-गुमान घरला सुटली. दुसऱ्यादिवशी गावात हि बातमी समजली........
त्यानंतर दादया आणि तेची दोस्त मंडळी दोन दिवस तळ्यावर मुक्कामालाच हुती.
आता सगळयांची अंथरूण आणि आखंड देउळ धूऊन काढायचं म्हणजे येवढा वेळ लागणारच की राव.