Monday, 10 January 2011

संक्रमण काळाचा आणखिन एक बळी

ती अशीच एक हसऱ्या चेहऱ्याची, नाजूक, अल्लड, पण तितकीच अबोल स्वत:च्या विश्वात रमणारी, स्वप्नाळू डोळ्यांची. नुकतीच लहानाची मोठी झालेली.
बाहेरच्या जगाची नवीनच ओळख झालेली त्यामुळे थोडीशी भाबडी. आई बापाची एकच मुलगी त्यामुळे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली.

बरोबरीची भावंडे कुणीच शिकलेली नसल्यामुळे हिची हुशारी सगळ्या भावकीत कौतुकाचा विषय. घरची शेती-भाती बाकीचा जोड-धंदा यामुळे तशी संपन्नता; पण तस फारस कुणी शिकलेल नसल्यामुळ शिक्षणाच्या महत्वापेक्षा फक्त कौतुचाच विषय जास्त.
त्यात तिचा शाळेतला पहिला नंबर तसा कुणा-कुणाच्या नजरेत खुपायाचा त्यामुळं बारावी झाली तशी काही मंडळी आडून आडून सुचवू लागली; झाली तेवढी शाळा बस झाली पोरीच्या जातीन काय करायचं हाय शिकून? पण बापान पोरीचा हट्ट मानला आणि पोरीला कोल्हापूरच्या कॉलेजात घातल.

कॉलेजच ते रंगीबेरिंगी मनाला भूरळ पाडणारं वातावरण, त्यात नुकतच मिळालेल थोडफार स्वातंत्र्य यामुळ तीच मन उमलत्या वयातली स्वप्न पाहू लागलं. कुणा अनामीकाची साद तिच्या मनात भावनांच वादळ उठवू लागलं आणि अशातच तिला आपल अस वाटणार कुणीतरी मिळालं.

तो तसा तिच्या दररोजच्याच दिसण्यातला, पण आतापर्यंत इतरांसारखाच वाटणारा तो आज-काल मात्र हिच्या मनाला आपलासा वाटू लागला होता. दोघांची नजरभेट आता एका नव्या नात्याचे अकुंर फुलवू लागली. तो तसा तिच्या पेक्षा २-३ वर्षांनीच मोठा; नुकतंच थोडं-फार शिक्षण घेउन नोकरीच्या मार्गावर असलेला. तारुण्यातली एक-मेका बद्दल वाटणारी ओढ लवकरच प्रेमाच्या बंधनात अडकली.

कधी-कधी उद्याची स्वप्न रंगवणारी पत्र, कधी कॉलेजच्या बाहेर होणारी ओझरती भेट; अशी त्यांची प्रीत बहरत चालली होती. त्याच्या अनुनायामध्ये ती सार जग विसरून जायची;

अशीच एक दिवस कॉलेजच्या बाहेर त्याला भेटताना; तिला एका नातेवाईकाने पहिल. आपसूकच हि बातमी तिच्या घरी भयंकर वादळ उठवून गेली, भावकितली कुजबूज आई-वडिलांना अस्वस्थ करू लागली. आईने एक दिवशी धीर करून पोरीला याबद्दल विचारलं. तिच्या भावना प्रामाणिक असल्यामुळे तिनेही काही न लपवता आईला खर काय ते स्पष्टच सांगून टाकल.

सामाजिक चालीरीती, परंपरा रूढी  यांना माननाऱ्या तिच्या आई-बापानी दोघांच्या लग्नाचा विचार केला खरा पण अजून नोकरीत कायम नसलेल्या मुलाच्या आई वडिलानि याला स्पष्टच नकार दिला. आणि तीच्या साठी जसं आभाळच फाटलं. आई-बापाच्या जीवाला आता भावकी टोचून खाऊ लागली. पोरीचा घोर बापाच काळीज पोखरून खाऊ लागला. अशातच नात्यातलच एक स्थळ हिला सांगून आल. मुलगा हिच्या पेक्षा चांगला ८-१० वर्षांनी मोठा; घरी दारुडा बाप आणि एक अपंग भावंड. नाही म्हणायला मुलगा जवळच्या साखर कारखान्यात कामगार होता हीच जमेची बाजू.

आई बापाच्या दृष्टिन आता तिला याच्या पेक्षा दुसर चांगलं स्थळ कुठ मिळणार होत?
पण तीच कोवळ मन मात्र पूर्ण फाटून गेलं. तिच्या स्वप्नांचा असा चुराडा होताना पाहून काही शिकल्या-सवरल्या माणसांनी तिच्या आई-बापाला समजावण्याचा प्रयत्न केला.

जाऊ दे लहान आहे ती; या वयात असं व्हायचंच, तीच शिक्षण तरी पूर्ण होऊ द्या. 

बाबा तुमच्या पुण्या-मुंबईला असं चालत असल इथ आमाला गावात इज्ज्तीन राहायचं हाय

अहो आज-काल एवढ चालतच; मुलगा मुलगी भेटले, बोलले यात एवढ वावगं नाही

अरे हि सगळी बाहेरची थेर आहेत, टीव्ही पिक्चर मध्ये बघून हि पोर काय तरी शिक्त्यात आणि आई-बापाच्या जीवाला नसता ताप करून ठेवत्यात. आता आमी हिला शिकायला काय नगो म्हणलो होतो का? पण नको ते धंदे कशाला करायचे??

जाऊ दे एकदा माफ करा तिला.शिक्षण पूर्ण झाल कि चांगली नोकरी लागेल, चार पैसे मिळवेल, बाहेरच जग कळेल तिला

अरे पैसाच मिळवायचा असल तर शिकायलाच कशाला पाहिजे? आमी आता कुठ शिकलोय पण आमाला काय कमी पडलय सांग बर? (आता वर्षाला नुसता ऊसच  ५००-६०० टन पिकवणारया तिच्या बापाला पैशाबद्दल कुणी काय बोलाव?) आणि आता तू एवढा शिकलास इथ नोकरी मिळाली का तुला? आता तुझ्या आई-बापान तुझ्या नोकरी पायी गाव-घर सोडून तुझ्यापाठन फिरत बसायचं का? तू उद्या अशीच शिकलेली जीन प्यांट घालणारी बायको करशील, पण ती तुझ्या पोरास्नी आपल्या चाली-रिती शिकवलं का सणा-सुदीला स्वत:च्या हातान गोड-धोड करून घालल का? का हाटेलातल रेडी-मेड?. अरे माणसान आपलं पण कधी इसरू नये? अरे तुमी सगळीच फोरीनला जाऊन आल्यागत कराय लागलासा तर आपलं अस्सल म्हणाय सारख नावाला तरी काय उरल काय रे हिथ? हे बघ मूळ सोडलेली झाड जास्त जगत नाहीत म्हणूनच माणसान सुदिक आपल मूळ कधीच विसरू नये

ते सगळ बरोबर आहे. पण तीला तीच्या पसंतीचा; तिला शोभणारा दुसरा चांगला मूलगा बघा? त्यांच्यात अंतर पण जास्त आहे, आणि तीच वय तरी काय आहे आता?           

हे बघ झाली तेवढी गमजा बास झाली, पोराच म्हणत असशील पोरग आमच्या माहितीतल हाय. ते काय आमच्या शब्दांबाहेर नाही. हिला तिथ काय बी कमी पडायचं नाही, हं आता वयात अंतर जरा हाय पण हीन जर का असं काय केल नसत तर आमी बी हेच्या पेक्षा भारीतल स्थळ काढल असतच की. आमच्या पोरीच सुख आमाला नगो हाय का?    आणि हे सगळ प्रकरण माहित असून सुध्धा पोरग लग्नाला तयार हाय यातच सगळ आल? आता आमी बी थकलोय हिला आई-बापा बद्दल काय वाटत असल तर ती आमच ऐकल

आठ दिवस झाले या गोष्टीला; पण तिचा तो डोळे भरलेला चेहरा काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता. अशातच बातमी समजली कालच तिच लग्न घरातल्यांनी ठरवलेल्या त्या मुलाबरोबर गावाबाहेरच्या देवळात साधेपणाने पार पडल.

आज-काल अशा गोष्टी नेहमीच आजू-बाजूला घडताना दिसतात. शहरात एकट रहात असता जास्त जाणवत नसल तरी बाहेर एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे बदलत्या सांस्कृतिक संकल्पना. अत्यंत वेगाने वाढणाऱ्या कम्युनिकेशनमुळे म्हणा किंवा मेडिया मुळे म्हणा जस जग फार जवळ येत चाललय आणि त्याचा परिणाम म्हणून पाश्च्यात्य संस्कृतीचा आपल्यावरील प्रभाव नक्कीच वाढत आहे. त्यांची कॉपी करणारा एक वर्ग आज आपल्यात आहे तर; तर त्याला विरोध करणारा दुसरा कट्टर वर्ग, बहुधा जुन्या-जाणत्यांचा. काळ बदलतो आहे त्याप्रमाणे आपले विचार बदलतील आणि संस्कृतीही नक्कीच बदलेल; पण या दोन वर्गांच्या लढाईत कोण जिंकतो कोण हरतो यावर आपले सांस्कृतीक भवितव्य अवलंबून आहे, कदाचित दोन्हींचे फ्युजन होऊन एक नवीनच संस्कृतीहि बनेल.

पण आजचा काळ मात्र आहे अवघड संक्रमणाचा आणि या संक्रमणाला सामोरी जातेय ती आजची तरुण पिढी या दोन्ही वर्गाच्या लढाईत घुसमटलेली; काय चूक काय बरोबर यात गोंधळलेली  आणि म्हणूनच या संक्रमण काळाचा बळी ठरली आहे ती वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आपली हुशारी, शिक्षण, आवड बाजूला ठेवून आपल्या आई-वडिलांसाठी आपल्या स्वप्नांचा चुराडा करून ४ माणसांच कुटुंब एकटीन चालवायला तयार झालेली. संक्रमण काळाचा आणखिन एक बळी.

**** तरुण पिढीच्या मनातली आणखिन एक अशीच लढाई इथे जरुर वाचा.3 comments:

  1. खरच छान लिहलय. कोल्हापुतला कुठे असता?

    ReplyDelete
  2. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद!!! मी कोल्हापुरात कसबा-बावडयाला राहतो.

    ReplyDelete