Sunday, 23 January 2011

घोडं गंगेत न्हालं

पाच-सहा वर्ष झाली या गोष्टीला. मी नुकताच केमिकल फिल्ड मधली उमेदवारी सोडून काही तरी भन्नाट करायच्या इराद्यान आणि कोल्हापूरच्या ओढीन कोल्हापुरला परत आलो होतो. घरचे दाखवत नसले तरी मनातून खार खाऊन होते; आता काय दिव लावतय कुणास ठाऊक? असा सगळ्यांचा सूर 

दिप्या माझा मित्र. अगदी खास; इंजिनिरिंगच्या पहिल्या वर्षापासूनचा त्यामुळ कॉलेज पेक्षा जास्त वेळ आमी तेच्याच रूमवर पडीक असायचो. आमच्या बहुतेक सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर Activities’ तिथच चालायच्या. दिप्या आमच्या सगळ्यात हुशार आणि होतकरू त्यामुळ आमच्या घरातल्यांचा पण कौतुकाचा. पन्हाळा तालुक्यातलं तस थोडं दुर्गम भागातल तेच गाव. त्यामुळ वागण्यात अस्सल गावरानपणा. बऱ्याचदा त्याच्या गावातल्या गमती-जमती, राजकारणाच्या गप्पा ऐकताना मज्जा यायची. दरवर्षी म्हाईला न चुकता दिप्याच्या गावाला जाऊन रावण रस्सा हाणून यायचो. कधी-कधी सेंटी झाला कि त्याच्या गावातल्या तीच्या बद्दल बोलायचा. ती त्याच्याच गावातली; आणि तशी नात्यातलीपण; पण दोन्ही घरात राजकारणामुळ वितुष्ट आलेलं. तरीही त्यातूनच चिठ्या, कधी एखादा फोन असं याचं प्रेमपण बहरत चाललेलं.

इंजीनीरिंगच्या फायनल ईयर ला जाईपर्यंत याचं सुद्धा फायनल झालं. पण घरात सांगणार कोण? कारण दोन्ही कडून प्रॉब्लेम. परीक्षेचा निकाल लागला तसे सगळेजण आपापल्या वाटेन निघाले; आमी xxx  करायला कोकणात गेलो तर दिप्या पुण्याला. असच वर्ष उलटल. दिप्यान जॉब करता करता आकुर्डीच्या डी वाय पाटील कॉलेजात एम. ई. ला Admission घेतलेलं.

मी कोकणातली नोकरी सोडली आणि तसाच पुढ पुण्याला जाऊन दिप्याची गाठ घेतली. २ दिवस मुक्काम केला आणि मगच कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात आलेल्या चौथ्याच दिवशी दिप्याचा मला फोन.

आरे; तिच्या घरात कळलंय; तिच्या चुलत्याचा मला फोन आलता. परत भागात दिसलास तर पाय तोडून ठेवीन म्हणालाय.....

मी म्हटल आरे पण कळाल कसं काय? तुझी परीक्षा झाल्या शिवाय सांगायचं नाही अस ठरलं होत ना?

व्हय रे; पण तिच्या घरची तीचं लगीन ठरवाल्यात; म्हणून तीनं सांगून टाकल सगळ.

असू दे आता; लगीच काय चार दिवसात लगीन होत नाही; तुझी परीक्षा ४-५ दिवसात संपतीया; मग कोल्हापूरला ये; आपण ठरवू काय करायचं ते. लई काय टेन्शन घेऊ नको. अभ्यासाकड लक्ष दे मी अगदी मोठया तोंडान चार गोष्टी सांगितल्या.

दिप्याची परीक्षा होऊन ३-४ दिवस झाले तरी दिप्याचा पत्ता नाही. मी म्हटलं भानगड तरी काय? असा विचार करतानाच दिप्या दत्त म्हणून दारात हजर; बरोबर संदीपदा (संदीपदा आमच्या बरोबरीचाच; आमी त्याला संदयाच म्हणायचो पण या प्रसंगानंतर तो आमच्यासाठी संदीपदा झाला. आता कसा? ते पुढ बघू.)

मी म्हटलं दिप्या काय झाल रे? कुठाय पत्ता तुझा?

दिप्या म्हणला हे बघ सगळ ठरवूनच आलोय; आत्ताच येताना आर. एल. मधन एक ग्रामच मंगळसूत्रपण घेऊन आलोय.

ह्या गुरुवारी रात्री; तू, मी, दिप्या आणि वैनी (दिप्याची ती) आपण सगळी गाडीन पहिल्यांदा रत्नागिरीला जायचं आणि तिथन मुंबईला; त्यामूळ कुणाला लगेच शंका येणार नाही. मी गाडी पण ठरवून आलोय. जिप्सी. GAS-KIT हाय; त्यामुळ जास्त खर्च पण यायचा नाही. इति संदीपदा.

माझ्या डोक्यात जाळ. मी म्हटलं, अरे xxxच्यानो. तुम्ही पोरगी पळवून न्ह्यायच प्लानिंग केलायासा का? ट्रीपला जायचं. आर जरा तरी काय डोक्याचा भाग?

म्हण GAS-KIT ची गाडी हाय; आरं एकवेळ गाडीत पोरगी हाय म्हणून पकडणार नाहीत पण GAS-KIT ची गाडी हाय म्हणूनच पकडतील आपल्याला रस्त्यात

आणि मुंबईला जाऊन काय xxxणार हाईसा? काय करणार मुंबईला जाऊन?

हे बघ तू लई शाणपणा करू नकोस, तिथं जाऊन रावल्या कड राहायचं. मग बघू पुढ काय करायचं ते इति दिप्या.

हे बघ दिप्या; ह्या सगळ्या काय खायच्या गोष्टी नाहीत; जरा सिरीयसली विचार कर, पोरगी घरात नाही म्हटल्यावर सगळ्या गावात बोंबाबोंब हुणार, तिचा बाबा नाही म्हटलं तरी पोलीस कम्प्लेंट करणारच. तुझ्या घरच्यांना किती त्रास हुईल हे कळतं का तुला?

आणि चुकून बिकून जरी पोरगी आईन टायमाला पलटली तर नुसता तूझाच नाही तर तुझ्याबरोबरच आमचाबी पेपरला फोटो ईल प्रमुख आरोपी आणि त्याचे साथीदार म्हणून

हे बघ; मी पोलिसांच्या माराला भीत नाही; पण बदनामी झाली तर ते आमच्या घरात पटणार नाही त्यात आधीच मी नोकरी सोडून आलोय मी माझी बाजू सावरायचा प्रयत्न केला.  

पुढ म्हणालो अरे तुझ्या घरच्यांचा पण जरा विचार कर. किती कष्टातन त्यांनी तुला शिकीवलय. हे बघ आपण आस करू मी जाऊन डायरेक्ट तिच्या बापाला जाऊन भेटतो आणि सगळ बरोबर बोलतो; तू चांगला शिकलेला हाईस; तुझ्यासारख पोरग त्यास्नी शोधून सुद्धा मिळणार नाही.

आसल काय हुईत नसत दिप्या.

अरे पण बोलून बघायला काय हरकत हाय, पायजे तर आपण तुमच्या दादाला बोलून बघू, बघुया त्यो काय मार्ग काढतोय का ते.

त्यो काय ह्यात पडणार नाही; वरन मलाच पायताणान हाणून घराच्या भाईर काढल

दिप्यान माझे सगळे मुद्दे खोडून काढले; शेवटी कसं-बस् मी त्याला म्हटलं; दोन दिवस थंड डोक्यान तुझ्या घराचा; तिच्या घरचा, सगळ्यांचा जरा विचार कर, मग बघू आपण काय जमतं ते आस म्हणून त्या दोघास्नी घालवून दिलं.

दोन दिवसान दिप्या सांच्यालाच आमच्या घरात हजर. मग मी एक शक्कल काढली; माझ्या वळखीचा शिवाजी पेठत एक वकील हुता; त्याला केला फोन आणि म्हटलं आशान-आस हाय आणि तुम्ही जरा आमच्या मित्राला समजून सांगा.

जरावेळान दिप्याला घेऊन त्या वकिलाकड गेलो; वकिलान त्याच्या परीन दिप्याला समजून सांगायचा प्रयत्न केला, दिप्यावर बऱ्यापैकी परिणाम झाल्यागत वाटलं. याच खुशीत आमी
रंकाळ्यावर गेलो; दाबून भेळ आणि आईस्क्रीम खाल्ल आणि परत घरला आलो.

त्यादिवाशिच्याला दिप्या आमच्याकडच झोपायला हुता. रात्री दिप्या परत सेंटी झाला आणि मूळ पदावर आला, मग मला बी काय बोलता येईना. सगळच अवघड हून बसलेलं. रातभर माझ्या डोळ्याला डोळा नाही आणि दिप्या निवांत घोरत हुता/

सकाळी उठून दिप्या मला म्हणतो कसा; चल मी निघतो आता; मला बरीच कामं हाईत

मी म्हटलं कसली रे काम काढलाईस आत्ता?

विद्यापीठात जाऊन जरा प्रोजेक्टची चवकशी करायची हाय; झालच तर एक मित्राच्या काकीला टायफाईड झालाय; तिला बघाय जायचं हाय

मी डोक्याला हात लावला आयला हेच्या असल्या भानगडीमूळ माझ्या तोंडच पाणी पळालय, टेन्शनमूळ जेवण गोड लागना आणि हेला तर काय नाहीच, निवांत आपली कसलीबी काम सुचाय लागल्यात

मी म्हटलं बर बाबा!! काय हुतय ते सांग मला, फोन करून

यावर दिप्या म्हणतो कसा आता आणि काय हुतय; संदयान सांगितलेला प्लान फिक्स हाय; तू तयार रहा म्हणजे झाल

दिप्या जाता जाता माझ्या पायात साप सोडून गेला. मी घाबरत घाबरत त्या दिवसाची वाट बघू लागलो, मला वाटलं आदी-मधी निदान प्लानिंग फिक्स करायला तरी मला फोन येईल. पण काहीच खबर-बात लागेना. आणि शेवटी तो दिवस उजाडला, दिवसभर मी फोन भवतीच घुटमाळलो; फोन ची रिंग वाजली कि दचकून बघायचो.

संध्याकाळी असाच कुठतरी बाहेर गेलतो; परत आल्यावर समजल कि दिप्याचा दोन वेळा फोन येऊन गेला. परत फोन करावा म्हटलं तर आयला हेच्या मोबाईलला रेंज नाही; घरला फोन लावला तर ह्यो घरात नाही. मला काय कराव हेच कळना. म्हटलं आयला प्लान तर आज रात्रीचाच हुता!! आता काय कराव? का जाव डायरेक्ट दिप्याच्या गावाला?
पण डेरिंग हुईना, आणि जाताना घरात तरी काय सांगायचं? घरातल्यांना तशी शंका आलातीच काय तरी भानगड चाललीय ती.

तशीच भीत भीत रात्र काढली; रात्री फोन जवळच झोपलो; म्हटलं कधी बी फोन येईल आणि आपल्याला जायला लागल. रात्रभर वाईट वाईट स्वप्नांनी जाग व्हायची; कधी आमी सगळी गाडीत बसायच्या अगोदरच पोरीच्या बाबाला गावलोय असं दिसायचं तर कधी पोलीस ठाण्यात बदया मार खाताना दिसायचो.

कशी-बशी सकाळ झाली. मला वाटलं बहुतेक दिप्याला माझ पटलय वाटत; म्हणूनच प्लान रहित केला असल. थोड्यावेळान आमच्या घरचे सगळे कामा-धंद्याला बाहेर पडले; तसा मी एकटाच सुशिक्षित बेकार घरी.

बसलो परत फोनची राखण करत. आत्ता फोन वाजतोय का मग वाजतोय.
तेवढ्यात दाराची बेल वाजली. मी भीत-भीतच दरवाजा उघडला. बघतोय तर काय दिप्याचा दादा दोन पोरास्नी घेऊन आमच्या घरला. मी मनातल्या मनात म्हटल आता काय खर नाही, तरी बर घरातली सगळी बाहेर गेल्यात; नाही तर इथच झाली असती बिन-पाण्याची.

पण मग उसन आवसान आणून म्हणालो काय हो दादा एकदम अचानक? आणि घर कसं काय सापडलं तुम्हाला?

यावर दिप्याचा दादा म्हणतो कसा हम्म त्यात काय अवघड हाय? कोण बी कुठबी असलं तरी आपण शोधून काढू शकतोय. समजलं काय?

हेच्या वर मी काही न समाजाल्यागत करून त्यांना घरात बोलावलं. चहा करून दिला, बाहेर ह्या तिघांच काही तरी खुस-पाट चालू होत. बहुतेक मी दिप्याचा एकदम खास असल्यामुळ मी घरात सापडणार नाही; तेच्या बरोबरच गेलेलो असणार असा त्यांचा अंदाज होता, आणि मला घरात बघून दिप्याला शोधायला आलेले ते एकदम गोंधळून गेले होते.

तोच धागा पकडून मी म्हटलं कसं काय येण केल म्हणायचं?

म्हणजे तुला माहित नाही काय? तुझा त्यो दोस्त गेला कि त्या पोरीला घेऊन पळून

मी पण अंदाज काढायच्या दृष्टिन बोललो आस्सं? कधी? मला काय माहित नाही. अहो असं काय करू नको जरा घरच्यांचा विचार कर, किती कष्टात शिकीवलय तुला त्यांनी; असं मी त्याला समजून सांगितलं तर माझ्यावरच चिडून गेलाय त्यो. मला ह्यातल काहीच माहित नाही

हि मात्रा बरोबर लागू पडली. दादा म्हटला आयला मग गेल कुठ आसल ह्ये? आणि असल काय करायच्या अगोदर आम्हाला सांगितलं असत तर आम्हीच करून दिल असत लगीन, काय पावण-पै आपल्यात बसणारेच हुते.

बर ह्यो संदीप कोण? तेच्या घरला घेऊन चल आम्हाला

मी मनातन चरकलो; म्हणजे ह्यास्नी सुगावा लागलाय तर!!! पण मग लगेच सावरून म्हणालो संदीप आमच्या बरोबरच होता कॉलेजला, मला माहित हाय त्यो, पण तेच घर काय मला माहित नाहि.

बर मग राव्ल्याचा तर फोन नंबर दे, तेच्याकड तर गेलाय का बघू.

आता राव्ल्याचा फोन नंबर माझ्याकड नाही हि थाप काय दादाला पचली नसती म्हणून नंबर द्यायच्या ऐवजी मीच डायरेक्ट राव्ल्याला फोन लावला आणि बोलता बोलता त्याला अंदाज दिला कि दिप्याचा दादा माझ्या समोर आहे ते.

पण राव्ल्या कसला महाकलंदर!! मला म्हटला काय सांगतईस?? अरे त्या xxxच्या दिप्यान मला जरा तर काय सांगायचं का नाही?

मी कन्फ्यूज. मी तसाच फोन दादाच्या हातात दिला, दादाच्या तोंडावरच दिप्याला अस्सल कोल्हापूरी शिव्या देऊन राव्ल्यान दादाला पण तेच सांगितलं आणि म्हणाला चुकून बिकून जरी माझ्याकड आलीत नाही तर मला फोन केला तर पयल्यांदा तुमास्नी कळीवतो.

आता मी आणि दिप्याचा दादा दोघपण कन्फ्यूज, खरच हे दिप्या कुठ गेलं आसल?

परत दिप्याचा फोन-बिन आला तर तेला गावात पाय ठेवू नको म्हणून सांगितलंय म्हणून सांग; असा दम देऊन दिप्याचा दादा निघून गेला.

मला प्रश्न पडला हे राव्ल्या कड पण गेल्याल नाही मग नक्की गेलं कुठ आसल?
गाडी काढली आणि तसाच संदिपदांच्या घरी गेलो. संदीपदा म्हणाले काय काळजी करू नकोस मीच त्या दोघास्नी पुण्यापर्यंत पाठवून देवून आलोय.

मग ती पुढ कुठ जाणार हाईत? मी प्रश्न केला.

अरे ती आतापर्यंत राव्ल्याकड पोचलीपण असतील मुंबईला. आता राहू देत तिथं २-४ दिवस मग बघू काय होतं ते.(धन्य ते संदीपदा आणि धन्य त्याचं प्लानिंग)

मी मग निर्धास्त होऊन परत आलो. ४ दिवसांनी संध्याकाळी दिप्याचा फोन,
मला म्हणतोय कुठ हाईस? मी म्हटलं xxxच्या; पळून गेलास तू आणि वर मलाच विचारतोस व्हय?

मला म्हटला हे बघ आत्ता मी कोल्हापुरातच हाय; कुठ हाय ते उद्या सांगतो.
पण उद्या तू रेशन कार्ड आणि तुझा फोटो घेऊन तयार रहा. मी बर म्हटलं.

दुसरेदिवशी उजडायला संदिपदांचा फोन सांगितल्याप्रमाण तयार होऊन तासाभरात ताराबाई पार्कात आमुक-आमुक ठिकाणी ये. नाही तर घरात येऊन मारीन मला काय कळना. पण जास्त खोलात न जाता मी आपला ठरलेल्या ठिकाणी पोचलो. बघतोय तर एका नव्या घरात ह्या नवीन जोडीची रात्रीपुरती सोय केल्याली.

पुढची चौकशी केल्यावर मला अस कळलं कि गुरुवारी रात्री ठरल्याप्रमाण संदीपदा ठरवलेली गाडी घेऊन दिप्याच्या गावाबाहेर एक धरण आहे तिथं जाऊन थांबले. रात्री बारा वाजता दिप्या गावातल्याच एक दोस्ताला घेऊन बाहेर पडला; बाईक काढली आणि तिच्या गल्लीच्या कोपऱ्यावर आला. आधीच ठरल्याप्रमाणे दोन वेळा होर्न वाजवून इशारा दिला, पण ती काय बाहेर आली नाही. इकडं दिप्याची घालमेल. मग अस ठरलं कि तिच्या घरावरन पुढ जाऊन पुढच्या कोपऱ्यावरून परत यायचं. बाईक कोपऱ्यावर वळवून परत आणली; तसा तिच्या घराचा दरवाजा उघडला, आणि ती बाहेर आली. तशी तिला गाडी वर बसवून दिप्या आणि त्याचा दोस्त आयंशीच्या स्पीडन धरणावर पोचले.

संदीपदा तिथं वाटच बघत होते. बाईक तीथच धरणाच्या बाजूला लावली आणि सगळी मंडळी गाडीत बसून तराट कोल्हापूर पार करून पुण्याच्या दिशेन सुटली. पुण्याला पोचायला सकाळी सहा वाजले, तिथं दिप्याच्या आणी एक मित्राच्या रूमवर जाऊन कपडे-बिपडे बदलले आणि नव्या जोडीला मुंबईच्या गाडीत बसवून संदीपदा आणि दिप्याचा गावातला दोस्त माघारी कोल्हापूरला फिरले.

दिप्या आणि ती मुंबईला रावल्याकड पोचले, संदीपदा कोल्हापूरला पोचले तेव्हा दिप्याचा दादा माझ्या घरी पोचला होता, पण येता येता त्याला धरणावर उभी केलेली बाईक दिसली आणि त्याला क्लू मिळाला कि गावातलपण कुणीतरी यात सामील आहे.

तो पर्यंत रावल्यान पुढाकार घेऊन मुंबईत कुठल्यातरी देवळात या दोघांच लगीन लावून दिल पण कायदेशीर अस काहीच झाल न्हवत. इकडे दिप्याच्या दादाने दिप्याचा गावातला दोस्त पकडला आणि तेच्याकडन सगळ वदवून घेतलं. पण आता करायचं काय?

इथे मग संदिपदांची मध्यस्थी कामी आली, त्यांनी कशी-बशी दिप्याच्या दादाची समजूत काढली. पोरीच्या बापान म्हटल्याप्रमाण दिप्याच्या सगळ्या घरा-दारावर केस केलतीच.
त्यामुळ कायतरी कायदेशीर मार्ग काढण गरजेच होत.

आता पुढ काय होतं ते बघू.

मग मी, आदरणीय संदीपदा, दिप्या, वैनिसाहेब, आणि गाडीचा ड्रायव्हर अशी सगळीजण पोचलो भूयाला. (नशीब गाडीला GAS-KIT नव्हत) दिप्याच्या दादाची इथली सासुरवाडी. मी मार खायच्या तयारीन खाली उतरलो. मला बघीतल तस दिप्याचा दादा चकित झाला आणि मला रागान म्हणाला आयला बाराचा दिसतोयस कि? आमाला त्यादिवशी थुका लावून पाठीवलस. आणि आता दिप्या बरोबरच हजर!!! तरी मला तुझी शंका आलातीच.

मी म्हटल दादा इथं रस्त्यावर काय नको; तुमी आधी घरात चला!! घरात जाऊन दिप्याच्या दादाला सगळ बयाजवार समजून सांगितलं. दिप्या पण म्हणला दादा!! हेला काय माहित नाही तो आता आमच्याबरोबर आलाय

तसा दिप्याचा दादा खवळला; म्हणला तू तोंडातन एक शब्द बी काढू नकोस!! तुझ्या शाणपणामूळ सगळी बोंब झालीया. उगीच तुला शिकीवला, शेतात नांगर धराय लावला असता म्हणजे हे दिवस दिसलं नसत

वातावरण तंग झालं तसा संदिपदानी होल्ड घेतला. दिप्याच्या दादाला घेऊन भाईर गेले. मी तिथच बसलो दिप्याजवळ. थोड्यावेळान दोघबी परत आले. दिप्याच्या दादाचा राग थंड झालेला दिसला.

मग मी आणि दिप्याचा दादा भाईर पडलो आणि दिप्याच्या मापाची नवीन कापड आणि नव्या नवरीला साडी घेऊन आलो. तवर नवरा-नवरीची आंघोळ, कसली तरी पूजा-बिजा आशी इथली सगळी तयारी झालती.

मग आमी सगळीजण नवरा-नवरीला घेऊन बाहेर पडलो आणि थेट मधल्या रस्त्यान गारगोटीला रजिस्ट्रार च्या ऑफिसात पोचलो. आदरणीय संदिपदानी इथं सुध्धा सेटिंग लावून ठेवल्याली. पोरीच्या बापानं आईन टायमाला काय घोळ घालू नये म्हणून दिप्याच्या दादाच्या सासऱ्यान तिथली गारगोटीतली देसायाची पोरं आजू बाजूला पेरून ठेवल्याली जेणेकरून काय झालच तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत कुणाला रजिस्ट्रार ऑफिस पर्यंत पोहोचता येऊ नये.

संदिपदानी केलेल्या सेटिंगमूळ लगीन न होताच आमी लगीन झाल्याच रजिस्टर बिन-बोभाट करून टाकल. नाही म्हणायला आईन टायमाला डमी भटजी शोधायला थोडी पळा-पळ झाली तेवढीच. मग पोरा पोरीच्या आणि दोन साक्षीदारांच्या सह्या घेऊन; पोरा-पोरीन तिथच एकमेकःच्या गळ्यात हर घातले आणि झाल लगीन. आता ह्या सगळ्या लडतरीत गारगोटीतच वाजले आठ.

मग तिथच देसाई सरांच्या घरात त्यांचे शिकारीचे किस्से ऐकत-ऐकत चा-पाण्याचा कार्यक्रम झाला; नव्या नवरीचा हळदी-कुंकवाचा वगैरे कार्यक्रम करून आमची वरात रात्री दहा वाजता दिप्याच्या गावाला निघाली.

गाडीच्या मधल्या शीटवर दिप्या आपल्या नव्या बायकोबरोबर अगदी दाबात बसला होता; शेजारी मी, म्हटलं आयला; नंबर मारलास बाबा!! दिप्या नुसताच हसला. मी काय म्हणतोय हेच्याकड तेच लक्षच नव्हत त्यो आपल्या भावी संसाराची स्वप्न रंगवत बसला होता. हलत डुलत शेवटी बाराच्या ठोक्याला आमची गाडी दिप्याच्या दारात पोचली. सगळं गाव सामसूम, दिप्याच्या दारात तेवढा एक बल लावलेला. मला आपली धाकधूक. गाडीचा आवाज येताच घराचा दरवाजा उघडला; दिप्याची वैनी आरती घेऊन भाईर आली; नव्या जोडीला ओवाळून घरात घेतलं. आमी सुध्धा तेंच्या मागन घरात गेलो; पुढच्या सोप्यात दिप्याचे वडील आणि भावकितली दोन माणस बसली होती; तेनी आमच्या कड चक्क दुर्लक्ष केलं आता मलाच कसातरी वाटाय लागल होत; आतल्या अंगाला कणगी शेजारी दिप्याची आई वळकट घेऊन झोपली होती, दिप्या जसा आईजवळ गेला तसा वाकळीतन मुस्मुस्न्याचा आवाज येऊ लागला. आमच्या गारगोटीतल्या पराक्रमान मी जो हरखून गेलो होतो तो दिप्याच्या घरातल्या वातावरणामुळ पार भुईला आलो. दिप्या तासभर आईच्या मिन्त्या करत बसल होतं, नवी नवरी बावरून कोपरयात आसव गाळत बसली होती. याच घरात कॉलेजला असताना दिप्याचे मित्र म्हणून आमच जे कौतुक व्हायचं त्याचा आज लवशेष हि नव्हता. आमच्या दिप्याच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा दिवस असताना सुध्धा घरात नुसती भयाण शांतता पसरली होती. मला तिथं बसण अगदी असह्य झालं होत.

दिप्याच्या वैणीने जेवणासाठी हाक मारली; शिरा,मसाले भात, बटाट्याची भाजी आणि कुरुड्या पापड असा आमच्या दिप्याच्या लग्नाच्या जेवणाचा बेत होता. पुरुष मंडळी जेवायला बसली, आईला समजावण्याचा प्रयत्न करून करून दिप्या थकला आणि माझ्या शेजारी जेवायला येऊन बसला. मी आपला खाली मान घालून ताटात वाढल होत तेवढं संपवण्याच्या मार्गावर होतो; कुणीही कुणाशीच चकार शब्दही बोलत न्हवतं. तेवढ्यात आमचा दिप्या म्हणतो काय वैनी; पापड हाय जरा?   

आता मात्र माझ्याच्यान रहावल नाही मी त्याला डायरेक्ट म्हणालो आरे दिप्या; लाज कि जरा! कुठ काय पराक्रम करून आलाईस व्हय?? यावर दिप्याच्या वैणीन हं; असुदे लाजायला काय पोरगी हाय व्हय? असं म्हणत सावरून घेतलं. मी आपला मनात विचार करत बसलो कुठल्या मातीची आहेत हि माणसं? एवढ्या मोठ्या प्रसंगात सुध्धा हे सगळे एवढे निवांत कसे?

सगळ्यांची जेवण-बिवण झाल्यावर संदीपदा मला म्हणाले चला आता आपलं काम संपल निघूया आपण मी म्हटलं एवढ्या रात्री? सकाळी जाऊ कि शिस्तीत.
हं? तुला काय बाबा मला काम हाईत. संदिपदांच्या या बोलण्यावर मी काय उत्तर देणार. शेवटी काही झालं तरी मी सुशिक्षीत बेकार.दिप्याला जवळ बोलवून चार गोष्टी सांगितल्या जरा सबुरीन घ्यायला सांगितलं आणि बसलो गाडीत जाऊन.

तासाभरात गाडी कोल्हापूरच्या जवळ येऊन पोचली; आता कोल्हापुरात एन्ट्री करणार एवढ्यात शिवाजी पुलावर जकात नाक्याशेजारी आमची गाडी पोलिसांनी पकडली. नुसती पकडलीच नाही तर गाडीची आणि आमची पूर्ण झडती घेतली. म्हणाले रात्रीच्या गोव्याकडन येणाऱ्या गाड्या चेक करायला लागत्यात; नको त्यो माल असतो एखादेवेळी गाडीत. यावर पोलिसांना काय तरी थातूर मातूर उत्तरं देऊन आम्ही सटकलो, पण पुढ आल्यावर संदिपदांना म्हणालो

काय संदीपदा; त्यादिवशीपण अशीच गाडी चेक केली असती तर? संदीपदा उत्तरादाखल नुसतेच हसले. साल्याचं नशीब बघा कोल्हापूरचे दोन आणि पुण्यापर्यन्तचे चार अरे सहा नाके असताना सुध्धा हे लोक सुखरूप मुंबईपर्यंत पोहोचले; चुकून-बिकून जरी एखाद्या ठिकाणी कुणाला शंका आली असती तर???

असो. शेवटी आमच्या दिप्याच गंगेत घोडं न्हालं. सासऱ्यान केस मग घेतली, दोन्ही घरातला वाद मिटला. आज आमचा दिप्या दोन पोरांचा बाप झालाय. पुण्यात चांगल्या कंपनीत नोकरी करतोय. लग्नाअगोदर सासऱ्याला शिव्या घालणाऱ्या आमच्या दिप्याला आज सासऱ्याचा एकेरी उल्लेख केला तरी आमच्या सारख्या दोस्तांचा राग येतो
(मग आता हि पोस्ट पब्लिश केल्यावर काय होतय कुणास ठाऊक) म्हणच हाय ना जेच तेला आणि गाढाव वज्जाला

या सगळ्या प्रसंगातन आमच्या राव्ल्याचा महाबिलंदरपणा अधोरेखित झाला. आमचे आदरणीय संदीपदा महनीय ठरले आणि आम्ही नुसतेच बोलघेवडे.

अशी हि आमच्या दिप्याच्या लग्नाची स्टोरी. काय मंडळी कशी काय वाटली तुम्हाला?
काय म्हणताय? नाही नाही, क्षमा करा पण आदरणीय संदिपदांचा पत्ता आणि फोन नंबर कुणालाही द्यायचा नाही अशी वरन ऑरडरच हाय आम्हाला  


2 comments:

  1. वा.....खुप छान..
    पात्र ऊभी राहीली डोळ्यासमोर..

    ReplyDelete