Thursday, 27 January 2011

आयडिया केली ......

मार्च-एप्रिलचे दिवस होते. दिवसाचा उन्हाचा तडाखा सहन होत नव्हता आणि रात्रीच मरणाच उकाडायच. भरीस-भर म्हणून सरकारच्या कृपेन लोड शेडींगमूळ गावात १२-१२ तास लाईटच नसायची. मग कसला फ्यान अन् कसलं काय. निम्म गाव अंगणात झोपायच.

पण चौगले गल्लीतलं दादयाच घर तस जरा गचडीतच हुत; आजूबाजूला सगळी भावकितलीच घर चिकटून चिकटून बांधलेली; त्यामुळ गल्ली सुध्धा चिंचोळीच झालेली आणि त्यात कुणाच्या गाड्या; कुणाचा ट्रक्टर यामुळ रस्त्यावरन सप्पय चालायची बोंब मग झोपायच तर लांबच. दादयान मनातल्या मनात सगळ्या भावकीचा उद्धार केला आणि विचार करू लागला आयला यातन मार्ग काय काढावा?

असा विचार करत करत दादया गल्लीच्या कोपऱ्याला आला तसा तिथं त्याचा दोस्त संप्या  गाठ पडला. दादयान त्याला आपलं दुखण सांगितलं; दोस्तान दोन मिनिट विचार केल्यागत केलं आणि म्हणला एक आयडिया हाय; आपण आस करू तुमच्या गल्लीतली दोन-चार पोर गोळा कर आपण तळ्याकाठच्या देवळात झोपायला चालू करू आजपास्न!! तसपण लोड-शेडींगमूळ आता म्हाताऱ्यांची भजन-बिजन सगळी बंद झाल्यात; आपल्याला रान मोकळच हाय आता.

दादयाला आयडिया एकदम पसंत पडली. दादयान लगीच गल्लीतली २-४ पोर तयार केली आणि वळकटी-बिळकटी घेऊन देवळात झोपायला जायला चालू केलं. हळू-हळू आयडिया हिट झाली आणि जवळ जवळ आठ-दहा पोर झोपायला यायला चालू झाली.

तळ्याकाठच खंडोबाच देऊळ म्हणजे सगळ्या गावच श्रद्धास्थान एकदम जुनं, आणि प्रशस्त अलीकडच गावकऱ्यांनी देवळाचा जीर्णोध्धार केलता, सभामंडप चारी बाजून बंदिस्त करून ग्रील मारून घेतल होत; त्यामुळ दादयाची आणि दोस्त मंडळींची चांगलीच सोय झाली होती. रात्रीच तळ्यावरन येणाऱ्या गार वाऱ्याला पडायला भलतीच मजा यायची.

असेच १०-१२ दिवस गेले आणि एक नवीनच त्रास चालू झाला. सगळी झोपली कि हिकड-तीकड हिंडणारी ३-४ कुत्री हळूच येऊन अंथरुणात शिरायची आणि उबिला पडून राहायची.
झोपत कुणाचा हात पाय पडला कि कुंई-कुंई करत बसायची; आयला नसता डोक्याला ताप. मग उठायचं आणि सगळी कुत्री हाकलून काढायची पण झोपेच खोबरं व्हायच ते व्हायचंच.

काय करायचं काय करायचं असा विचार करण्यात दोन दिवस गेले, आता कुत्र्यांची संख्या पण वाढली होती. पण आमचा दादया म्हणजे कसला माणूस? तेच्या सुपीक डोक्यातन एक आयडिया निघालीच. दादयान पोर गोळा केली; म्हणला च्यामायला मी ह्या कुत्र्यांच्या!! निकालच लावून टाकूया आज

नेहमीप्रमाण सांच्यालाच पोर देवळात गोळा झाली, गप्पा-टप्पा आणि गावाची मापं काढून झाल्यावर अंथरून टाकली आणि जेवायला गेली. नेहमी पोर जेवायला गेली कि कुत्री एक एक करून अंथरुणात शिरून बसलेली असायची.

पण त्यादिवशी परत येताना दादयान सांगितल्याप्रमाण पोरं तयारीन आलती, प्रत्येकजण येताना टोणे, काठ्या घेऊन आलता. सगळीजण देवळाबाहेर जमल्यावर मग कुत्र्यांच्यावर एकदम हल्ला करायचं ठरलं. त्या बेतान एक एक जण आवाज न करता हळूच आत शिरला, एकान पुढ जाऊन गाभाऱ्याचा दरवाजा बंद करून घेतला. एक जण हातात टोना घेऊन सभामंडपाच्या दारात उभा राहीला आणि बाकीचे तिघे चौघे जण आत आपापली पोझिशन घेऊन उभे राहिले. दादया सगळ्यांचा म्होरक्या; तावा-तावान गेला पुढ आणि अंथरुणात शिरलेल्या एक कुत्र्याच्या पेकाटात एक रट्टा हाणला तस कुत्र जिवाच्या आकांतान केकाटत दरवाज्याकड पळाल; पण तिथ एक जण अगोदर तयार हुताच; तेन काय त्या कुत्र्याला बाहेर जाऊ दिलं नाही. आणि मग एक एक करून सगळ्या कुत्र्यांची तीच अवस्था झाली.
केकाटनारी कुत्री आणि चेव चढलेले हे ५-६ जण शूर-वीर; देवळात नुसता हैदोस चालला होता. आधीच सगळीकडे अंधार त्यात कुणाचा कुणाला पत्ता नाही. नुसती झोडपा-झोडपी. कुत्र भिऊन कोपर्यात जाऊन उभ राहील कि दादया शोधत शोधत जाऊन तेला मधी आणायचा आणि मग परत सगळ्यांनी मिळून तेला झोडपायच असा हा जंगी कार्यक्रम चांगली १०-१५ मिनिट चालला होता. शेवटी मारून मारून दादयाचे हात भरून आले तसा दादयान दोस्ताना इशारा केला आणि पाप बिचारया कुत्र्यांची सुटका झाली.

हाश्श-हुश्श करून दादया अंथरुणात टेकला..... एवढ्यात तेच्या हाताला ओल-ओल कायतरी लागल; दादया हात नाकाजवळ नेत वरडला आरं XXXच्यानो; हे काय हाय ......?   

सगळ्यांची अंथरुण भरून गेल्याली; देवळात बी सगळीकड चिकट चिकट लागतेलं. सगळी गप्-गुमान घरला सुटली. दुसऱ्यादिवशी गावात हि बातमी समजली........
त्यानंतर दादया आणि तेची दोस्त मंडळी दोन दिवस तळ्यावर मुक्कामालाच हुती.
आता सगळयांची अंथरूण आणि आखंड देउळ धूऊन काढायचं म्हणजे येवढा वेळ लागणारच की राव.

No comments:

Post a comment