गेल्या खेपेला कोल्हापूरला गेलो होतो त्या वेळचा किस्सा. अंबाबाई च्या देवळाचा जो घाटी दरवाजा आहे त्याच्या बरोबर समोर भारत बेकरीच्या शेजारीच माझ्या मित्राचं दुकान आहे. म्हणजे दुकानात त्याचे बाबा असतात पण आम्हा मित्रांचा एकत्र जमण्याचा तो ठरलेला स्पॉट.
दामले काका म्हणजे एकदम जॉली माणूस, स्वभावाने एकदम खेळकर, टिपिकल कोल्हापूरी स्टाईल. त्यामुळ तुम्ही दुकानात कधीही जा एखादवेळेस गिऱ्हाईक नसेल पण दामले काकांचा चार-चौघा मित्रां बरोबर गप्पांचा फड रंगलेला दिसणारच.
संध्याकाळच्या वेळेस महाद्वार रोडवर एखादी चक्कर मारण तब्बेतीला चांगल असत; या उदात्त हेतूनं मी असाच तिथे टपकलो; पण आमचा दोस्त जरा कुठे बाहेर गेला असल्यामुळ त्याची वाट बघत तिथेच टेकलो; नेहमी प्रमाणे काकांचे २-३ दोस्त होतेच; मी पण त्यांच्या गप्पांच्या अड्ड्यात सामील झालो. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना शेजारच्या दुकानातून एक माणूस घाई घाईने बाहेर पडताना दिसला, त्याला बघून दामले काकांनी जोरात हाक दिली;
“संभाजीरावSSS अहो या कि इकड; कुठ चाललाय एवढ्या गडबडीन??”
त्यावर संभाजीरावानी “आलो आलो, जाऊन येतो !!!” म्हणत करंगळी वर करून इशारा केला. त्यावर दामले काका म्हणाले “आहो; जाशीला कि या दोन मिंटट...”
यावर परत संभाजीराव मगाचाच इशारा करत म्हणाले “आलो हो !! येतो दोनच मिनिटात”
आणि बाजूच्याच प्रसाधन गृहात लगबगीने घुसले;
“गाडी फारच अर्जेंट दिसतीय!!” दामले काकांनी कमेंट पास केली, तसा दुकानातल्या मंडळीमध्ये हास्याचा फवारा उडाला.
संभाजीराव; ठेंगणी वामन मूर्ती, काळा-सावळा रंग आणि बेताचीच अंगकाठी, वयाच्या मानानं पोट जरा पुढ आलेल आणि चेहऱ्यावर नेहमी अतिशय भोळसट भाव. बाजूच्या कापड दुकानात काम करण्यात आयुष्य गेलेल; त्यामुळ आर्थिक परस्थिती तशी बेताचीच. अंगावर कामावरची थोडीफार चुरगळलेली, मळकटलेली कपडे, पायात स्लीपर. पण या सगळ्यात मन मात्र अतिशय स्वाभिमानी, कुणाचही दोन-पाच खपवून न घेणारं.
मोजून दोनच मिनिटात संभाजीराव परत आले; आणि दुकानाच्या पायऱ्या चढता चढता
म्हणाले; “हं; आता बोला काय म्हणत हुता?”
“म्हणतोय कशाला काय? म्हटल चीकोडे साहेब आल्यात बरेच दिवसांनी; भेटून जाशीला, पण तुमच आपल वाघ पाठीलागल्यागत....... पळतच सुटलाय अगदी....” दामले काका.
“आहो कसला वाघ; ‘ते’ आलत मघाशी दुकानात” (ते म्हणजे कुणीतरी माणूस असावा ज्याच्या बद्दल दामले काकांना माहिती असाव; आणि संभाजीरावांच्या बोलण्यावरून ‘त्या’ माणसाच आणि संभाजीरावांच पटत नसाव हे मी ताडलं)
“आस्सं? बर मग ??” दामले काका.
“मग काय? लावत बसल होत, मालकाबरोबर काय तरी थापा, मालाकालाबी तेच काय ग्वाड वाटतंय कुणास ठाऊक. बर गप् तर जाईल का नाही, म्हणला कसा!! आज
माझ्याकडन सगळयास्नी चहा सांगा”,
“मी पहिल्यांदा नाही म्हणालो; पण मालकापुढ काय चालतंय व्हय?” (साहजिकच संभाजीरावांच मानी मन ‘त्या’न दिलेला चहा प्यायला तयार होत न्हवत)
“म्हणजे? संभाजीराव तुम्ही ‘ते’न दिलेला चहा प्यालासा??” दामले काकांनी पिन मारली.
यावर संभाजीराव उसळून म्हणतात कसे
“हं!! मी बी काय गप् बसतोय व्हय? नुसती त्यो जायाची वाट बघत हुतो; त्यो जसं भाईर पडला रे पडला तसा मी पण तडक भाईर पडलो.......”
“आणि इकडं जाऊन आलो; आपण कुणाचच काय ठिवून घेत नाही” संभाजीराव परत करंगळी दाखवत म्हणाले.
यावर दुकानातली सगळी जुनी-जाणती मंडळी अगदी पोट धरून-धरून हसू लागली; मला पण पहिली दोन मिनिट काही कळेचना? काय झाल म्हणून........(शाब्बास र पठ्ठ्या! याला म्हणतात स्वाभिमान;अस्सल कोल्हापूरी )
मंडळी तुम्हाला कळलं का???
hmmm...sambhajirao navapramanech ahet... :-)
ReplyDeleteKharach purn blog khupach mast lihilay. Khupach maja ali.
ReplyDeleteKhup mast blog lihila ahe vachayala khup mast vatle.
ReplyDeleteamipan thivun ghet nahi bhagha.....vachlyavar maja aali CHAN LIHITOS
ReplyDelete