Friday, 25 February 2011

खाकी वर्दीची मिजास

खाकी वर्दीच्या माजोरीपणाचा अनुभव आपल्या सगळ्यांना एकदा तरी आलेला असतोच; त्यात तुमची चूक असो वा नसो. आणि मग तुमच्या माझ्यासारख्या पांढरपेशा माणसाला मूग गिळून गप्प बसण्याशिवाय काहीच मार्ग राहत नाही. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या खात्याच्या हातात आपला समाज किती सुरक्षित आहे हे आपण सगळे जाणतोच. आजची आपली अवस्था भीक नको पण कुत्र आवर यापेक्षा काहि वेगळी नाहीच. त्यामुळ मदत राहू दे बाजूला पण यांचा त्रास नको अशीच आपली एकंदरीत मानसिकता झाली आहे.

माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले. मध्यंतरी एकदा आम्ही पाच-सहा जण मित्र विमाननगर मध्ये पार्टीवरून परत येत होतो. रात्री ११-११:३० ची वेळ रमत-गमत गप्पा टप्पा करत आमचं टोळक रस्त्याच्या बाजूने चालल होतं. (आमच्यातल्या कुणीही कसलीही नशा केली नव्हती, सर्वजण अगदी पूर्ण भानावर होते)

इतक्यात विमाननगर, कल्याणीनगर भागात फिरणारी QRT (Quick Response Troup)ची गाडी सगळा रस्ता मोकळा असताना पाठीमागून येऊन आम्हाला चिकटली; आणि त्यातला एक पोलीस आम्हाला म्हणतो कसा काय रे भडव्यानो; तुमच्या XXXजवळ गाडी आली तरी तुम्हाला शुद्ध नाही का? शुद्धीवरती आणायला लागतय काय तुमाला?
हे ऐकून आमच्यातले जे शहाणे-सुरते होते ते गपगुमान पुढ सटकले; पण एकजण जरा गरम डोक्याचा होता तो त्यांना खुन्नस देत तिथच उभा राहिला. यावर गाडीतला एकजण म्हणाला बघतोस काय रे भडव्या? माज आलाय काय तुला? ह्याला घ्या रे आत. मग मात्र मी मध्यस्थी केली, म्हणालो माफ करा साहेब; चूक झाली. इथच बाहेर जेवायला गेलो होतो. जरा उशीर झाला

यावर गाडीतनं आवाज आला ठीकाय ठीकाय; मित्राला चड्डीत रहायला शिकव; नाहीतर चड्डी फाटेस्तोवर मार खाईल एक दिवस”  मी जरा निरखून बघितला तर गाडीत फ्रंटसीटवर बसलेला तो PSI किंवा हवालदार जो कुणी होता तो चक्क दारू पिऊन झिंगत होता. मी मनात म्हटलं “XXXच्यानो कोरेगाव पार्कात तुमच्या XXXखाली बॉम्ब स्फोट झाले तरी तुमच्या खात्याला पत्ता लागला नाही आणि आमच्या सारखी सुशिक्षित पांढरपेशी माणस दिसली म्हणून लगेच मिजास कराय लागलाय काय?

ह्या गोष्टीला ५-६ महिने उलटून गेले असतील तेवढ्यात परवाच आणखीन एक किस्सा घडला. एक महत्वाच्या कामासाठी मी २-४ दिवस सुट्टी टाकून कोल्हापूरला गेलो होतो. तारीख होती १७ फेब्रुवारी; वेळ साधारण दुपारी ११:३०-१२ ची असेल. मी बिंदू चौकातून पुढे मिरजकर तिकटीच्या दिशेने माझ्या बाईक वरून चाललो होतो.

एवढ्यात मला लांबून सायरन ऐकू आला, मला वाटलं कि एखादी अम्ब्युलंस वगैरे असेल म्हणून, आधीच कोल्हापुरातले जगप्रसिध्द रस्ते (कोल्हापूरी भाषेतच सांगायचं झालं तर इथल्या आमदार खासदारानी आणि महानगरपालिकेन IRB वाल्यांच्या मदतीन कोल्हापूरकरास्नी २२० कोटी रुपयांचा घोडा लावलाय) त्यात गर्दीची वेळ. पण संधी मिळताच मी सायरनवाल्या गाडीला वाट करून दिली. बघतोय तर काय एक पोलीस गाडी.
गाडी जवळपास फर्लांगभर पुढ गेल्यावर मी माझी बाईक परत रस्त्यावर घेतली, तसे मागून २-३ मोठे हॉर्न, पुढे गेलेल्या पोलीस गाडीतून तो हवालदार मोठ-मोठ्यान बोंबलाय लागला; मला म्हणाला
“ए माकडा, पाठीमाग दिसत नाही का तुला? (हेच्या बान् माणसाला पाठीमाग डोळ ठेवल्यात......)

मी माझी बाईक झटदिशी साईडला घेतली; तर पाठीमागून एक मंत्री महोदय Ambassador गाडीतून अगदी राजाच्या आवेशात चालले होते. मी जरा निरखून बघितले; गाडीचा नंबर होता MH-09 8989. आता ते असे कुठे दिल्लीवर स्वारी करायला चालले होते कुणास ठाऊक कि आपल्याला मंत्रीपदी बसवणारी हि रस्त्यावरची जनताच आहे; याचाही त्यांना विसार पडावा?.

त्यांची गाडी पुढे जाऊन परत गर्दीत अडकली; यावेळी बिचाऱ्या २-३ रिक्षावाल्यांनी त्या पुढे चाललेल्या पोलीस गाडीतल्या हवालदाराकडून स्वता:च्या आया-बहिणींचा अस्सल कोल्हापूरी भाषेत उद्धार करवून घेतला. आता मंत्र्याच्या गाडी पुढे आपली वाहने आणू नयेत असा कुठे कायदा आहे का? आणि २-५ मिनिट उशीर झाला मंत्री साहेबाना तर असा काय फरक पडणार आहे? आयला ह्या XXXच्यानी संसदेच सगळं अधिवेशन टाईमपास करण्यात घालवल; शेकडो कोटी रुपयांचा चुराडा केला; त्यावेळी कुठे गेले होते हे पोलीस?

हे सगळ बघून माझ डोक जम सटकल; वाटल रस्त्यावरचा दगड उचलून त्या रांडच्या पोलिसाला एक टीप्पिर्र्यात गार करावा. आयला साहेब पेक्षा शिपायाचीच मिजास जास्त.
पण करणार काय? गर्दीपुढ आणि वर्दिपुढ कुणाच काय चाललय का? झालेल्या अपमानामुळ मनातल्या मनातचं चरफडत त्या हवालदाराची आई-बहिण एक केली आणि गप्प बसलो.

दोन-तीन दिवस झाले आणि तेवढ्यात दैनिक पुढारी मध्ये खाली दिलेली बातमी वाचली. मग म्हटलं चला आता यावर एक पोस्ट लिहूनच टाकू. तसही प्रापंचिक लडतरीतून आपल्या ब्लॉगकड आपलं बरच दुर्लक्ष झालय. आयता विषय मिळालाय मनातला सल बाहेर काढायला कशाला सोडा?


3 comments:

  1. Dada brobar ahe ha anubhav sarvanach yeto (police ,mantri sodun)

    ReplyDelete
  2. नवीन पोस्ट टाका आता. बरेच दिवस वाट बघतोय.

    ReplyDelete
  3. purnpane sahamat..

    ReplyDelete