आज कालच्या पोरींचा काय नेम नाही. ह्या कुठ कधी कशा वागतील हेचा भरवसा हेंच्या आई-बापालाच काय पण प्रत्यक्षात ब्रह्मदेवाच्या बाला सुध्धा देता येणार नाही.
आता आमच्या झंप्यादाचच घ्या. हेचा आज्जा कोकणातन येऊन घाटावर स्थायिक झालेला. बा हेच्या लहानपणीच गेला. तवापासनं आईनंच काय-बाय काम करून टुकीन संसार चालवला. झंप्यादा बारावी पास झाला तसा थोरा मोठ्यांच्या हाता-पाया पडून एका कॉलेजात शिपाई म्हणून चिकटवला. झंप्यादा मुळचा कोकणातला असल्यामुळ गोरा-गोमटा. शाळेला असल्यापासन गल्लीतच २-३ प्रकरण झालेली. पण गल्लीवाल्यास्नी घराची परिस्थिती माहिती असल्यामुळं पुढ काय डाळ शिजली नाही.
मात्र कॉलेजात लागल्यापास्न झंप्यादाच्या ह्या कला-गुणांना नव्यान वाव मिळाला. आणि कॉलेजची घंटा बडवता-बडवता हेच्या दिलाची घंटी पुन्हा नव्यान वाजली. पोरगी चांगल्या घरातली दिसायला नेटकी आणि वागायला मॉड. झंप्यादान् मग आपला सगळा अनुभव पणाला लावला आणि रोज काहीतरी नवीन क्लुप्त्या काढून पोरगिला चांगलच इंप्रेस केलं. झंप्यादाचा ह्यो पराक्रम बघून दोस्त मंडळी तोंडात बोट घालायची.
झाल ज्युनिअर संपवून पोरगी सिनिअरला परत त्याच कॉलेजात आली; २-३ वर्ष कॉलेजात हि जोडी चांगलीच गाजली. शेवटच्या वर्षी मात्र हे प्रकरण पोरीच्या घरापर्यंत पोहोचलं. पोरगी ‘लगीन करीन तर हेच्यासंगच’ म्हणून हट्टून बसली. पण पोरीच्या घरच्या तालेवार मंडळीना शिपाई जावई कसा चालणार?. तेनी हर तऱ्हेन पोरीची समजूत काढली आणि परीक्षा होईपर्यंत आईच्या कडक पहारयाखाली पोरीच कॉलेज कसं-बस् पार पडलं. परीक्षा झाली तशी पोरीची रवानगी नागावंला थेट तिच्या चुलत्याकड केली. चुलता एकदम कडक तेच्या धाकाखाली पोरगी ८-१० दिवस एकदम शहाण्या सारखी वागू लागली. घरच्यांचा जीव भांड्यात पडला. तेनी पोरीसाठी १-२ तोलामोलाच्या ठिकाणी बोलणी चालू केली. पण इकडं पोरीच्या मनान परत पलटी खाल्ली; तीन् मैत्रिणीला फोन करण्याच्या नावाखाली परत झंप्यादाला contact केला. मग काय विझत आलेल्या विस्तवाला हवेची फुंकर लागली आणि झंप्यादाच्या मनातली आग चांगलीच पेटली.
पोरगी घरी वरवरणतरी एकदम नॉर्मल वागायची; त्यामुळं घरचे पण निश्चिंत झालेले. अशातच पोरीच्या सुपीक डोक्यातन प्लान निघाला; आणि चुलत बहिणींच्या बरोबर कोल्हापुरात फिरायला जायची परवानगी काढली. घराच्यानी पण विचार केला पोरगी आता शहाणी झालीय; बरेच दिवस घरात बसून कंटाळली असेल; जाऊन येऊ दे एकदा; जवळच तर हाय.
झालं. पोरीन झंप्यादाला सांगितलं “शेवटाचा चान्स आहे; काय करायचं असलं तर आत्ताच कर; नाही तर मला विसरून जा” झंप्यादा लागला कामाला विश्वासातली २-३ दोस्त मांडळी गोळा केली. सगळ्यांनी मिळून प्लान बनवला. कुणी-कुणी काय काय करायचं ते बी ठरवल. एक मारुती ओमनी ठरवली. झाली सगळी तयारी. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी पोरगी तिच्या दोन चुलत बहिणींच्या बरोबर कोल्हापूरला जाणार होती. तिथूनच तिला उचलायची असं ठरलं.
दुसऱ्यादिवशी सकाळीच झंप्यादा कोल्हापुरात जाऊन पोचला, ठरलेला स्पॉट नजरेखालून घातला. दोन पोर पुढ नरसोबाच्या वाडीला पाठवून दिली; सगळी तयारी करायला. सांच्याला ठरल्याप्रमाण पोरगी आपल्या बहिणींबरोबर खास्बागेच्या शेजारी ‘राजाभाऊ’ची भेळ खायला आली. आणि झंप्यादान् मोका साधला. पोरीच्या बहिणी भेळ खाण्यात दंग असतानाच पोरगिला अलगद ओम्नीत ढकलली आणि नरसोबाच्या वाडीच्या दिशेन धूम ठोकली. इकडं पोरीच्या बहिणींनी दंगा चालू केला; पब्लिक जमा झाल; कुणीतरी ‘जुना राजवाडा’ पोलिसांना बोलावलं.
पोलीसबी कधी नाही ते वेळेवर आले. त्यांना गर्दीतल्या कुणीतरी गाडीचा नंबर सांगितला.
RTO ऑफिस मधून गाडीवाल्याचा नंबर मिळवला. त्याला कॉल करून विचारलं तर त्येन मी त्या गावचाच नाही असं दाखवलं; म्हणाला “मी भाड घेऊन पुण्याला आलोय”. पोलिसांनी खात्री करायला परत मोबाईल कंपनीत चौकशी केली; कंपनीच्या जी.पी.एस. सिस्टीम वर मोबाईल पुण्यात नसून कुरुंदवाड परिसरात असल्याच दिसत होतं.
पोलिसांच्या अनुभवी नजरेला झाला प्रकार लागलीच समजला. तेनी मोर्चा थेट नरसोबाच्या वाडीकड वळवला. वाडीच्या देवळाच्या बाहेरच पार्किंग मध्ये ती ‘ओमनी’ लावलेली पोलिसांना दिसली. त्यांनी शिताफीन गाडीवाल्याला ताब्यात घेतला. मग गाडीवाल्यानच पोलिसांना झंप्यादा आणि पोरीजवळ न्हेलं. पोलीस तिथं पोहोचे पर्यंत हेंचा शेवटचा ‘फेरा’ चालला होता. पोलिसांना बघताच झंप्यादान शेवटचा फेरा पळतच पार केला आणि शेवटी ‘शुभमंगल’ पार पडलं.
पोलिसांनी तरीबी झंप्यादाला ताब्यात घेतला आणि चांगल्या २-४ ठेऊन दिल्या. पण ‘आता आपलं कोण काय वाकड करणार हाय?’ अशा अविर्भावात झंप्यादा निवांत होता. झंप्यादाची आणि पोरीची ‘वरात’ परत कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याकड निघाली. तिथं आणल्यावार परत एकदा झंप्यादाची चांगली ‘आरती’ झाली. तवर पोरीच आई-बा बी पोलीस ठाण्यात आलं. पोरीच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या बगून तिच्या आईन आख्ख पोलीस ठाण डोक्यावर घेतल; रडून-आरडून गोंधळ घातला, भिंतीवर डोस्क आपटून घेतल आणि शेवटी बेशुद्ध पडली.
आपल्या आई-बाची अशी अवस्था बघून; पोरगी मनातन चपापली. आणि परत एकदा तिच्या मनान् पलटी खाल्ली. पोरगी धावत जाऊन आई-बाच्या गळ्यात पडली; म्हणाली;
“आई-बाबा मी चुकले; भावनेच्या भरात मी असं वागले मला माफ करा; मी आता तुमच्या बरोबरच येणार”
(च्या मायला मी हिच्या ‘भावनेच्या’); आतापर्यंत पोरीवर भरवसा ठेवून निवांत बसलेल्या झंप्यादावर मात्र आता बोम्ब मारायची पाळी आली, तेन आता स्वत:च्याच थोबाडात हाणून घ्यायला सुरवात केली. पोलिसांनी तेला आतल्या खोलीत न्हेला. आणि पोरी कडच्या तालेवार मंडळी बरोबर प्रकरण नेहमीप्रमाणे ‘मिटवून’ टाकल. पोरगी आई-बा बरोबर निघून गेल्यावर; झंप्यादाला ग्लासभर थंडगार पाणी पाजलं आणि समज देऊन सोडून दिलं.
सगळीकडन् मार खाऊन आलेल्या झंप्यादाला आता कुणाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. मंडळी आता तुमीच सांगा ह्यात आता आमच्या झंप्यादाची काय चूक?
तेन् आता काय करायचं? कुठ जायचं? ‘कुणाच्या तोंडाकड बघायचं?’
का असच लोंबकळत फिरायच आयुष्यभर?
(सुज्ञ वाचकांना माझी उचलेगिरी समजली असेलच. कोल्हापूर परिसरात नुकत्याच घडलेल्या एका घटनेचे हे ब्लॉग पोस्ट मध्ये रुपांतर)
Lai bhari mastch
ReplyDelete