Thursday, 26 May 2011

आयला हे फेसबुक म्हणजे लईच काय तरी भारी दिसतंय बाबा....

काय झालंय तुला......?

.........

फेसबुक वर असा का स्टेटस अपडेट केलायस?

.........

मला आता सोनाली ने मेसेज केला तेव्हां कळलं.

.........

काय दुखतंय........पाठ?

........


काय??? आता थोडं बर वाटतय?

........

अरे मग तसं स्टेटस अपडेट कर बाकीच्यांना कसं कळेल?

........

मला वाटलं तुला आणि काय झालं?

........

ठीक आहे...... फोन कट.


माझा मुळचा मुंबईचा आणि आत्ता कामासाठी पुण्यात आलेला रूम पार्टनर, रात्री उशिरा घरी आला. आल आल ते एकदम सिरीअस; कुणाला तरी फोन लावला आणि मग वरचा संवाद.

आयला हे फेसबुक म्हणजे लईच काय तरी भारी दिसतंय बाबा....

आत्ता पर्यंत लई लोकांच्याकडन आईक्ल्याल पण हे एवढं भारी असेल असं वाटलं नव्हत.

आता कुणाची तरी पाठ दुखायला लागलीलय हि बातमीसुध्धा फेसबुकमधी झळकत आसेल; आणि त्यामुळ लोकं तुम्हाला काळजीन फोन करत असतील तर आणि काय पाहिजे? हि म्हणजे एकदम राष्ट्रपतीच्या वरताण अगदी व्ही आय पी ट्रीटमेंट झालं कि राव .....आं....?

चला. आत्ताच्या आत्ता मी पण फेसबुक वर माझ पण फेस बुक करून टाकतोच कसं.

नव्हे हे बघा टाकलच. सर्च तर करून बघा........!!!!


Wednesday, 25 May 2011

‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’?

मागच्याच आठवड्यात दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली कोल्हापुरात खपात 'सकाळ' नंबर वन  लगेच दुसरयाच दिवाशी दै. पुढारीने पण इंडियन रिडरशिप सर्वेचा दाखला देत प्रत्त्युत्तर केलं दुपटीहून अधिक वाचकसंख्येने पुढारीच्या निर्विवाद वर्चस्वावर पुन्हा शिक्का मोर्तब


खरं तर या सगळ्याला सुरवात तशी वर्षा-दीड वर्षापासूनच झालीय. मला वाटतंय पुढारीने जेव्हा पासून पुण्यात पाय रोवायला सुरवात केली, तेव्हापासून या वादाला तोंड फुटत गेलं. कदाचित आपण सगळ्यांनी हे ऑब्सर्व केलच असेल; पुढारीने ज्यावेळी पुणे आवृत्ती चालू केली त्यावेळी त्यांची जाहिरातच काहीशी अशी होती

आता सकाळचं पाहिलं काम पुढारी वाचायचं!!!; पी एम टी च्या अनेक बसेसवर हि जाहीरात त्यावेळी झळकत होती. आता पुढारीने अशी जाहीर कुरापत काढल्यावर सकाळ कसं गप्प बसेल?


त्यांनी मग कोल्हापूर आवृत्तीचे दर बिझनेस पोलीसी च्या नावाखाली कमी केले आणि मग मिडिया वॉर पेटलं; जवळपास आठवडा भर कोल्हापुरात हे धुमशान चालू होतं. पुढारीने विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनचा मुद्दा हाताशी धरून वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेला आपल्या बाजूने केलं; आणि मग काही वृत्तपत्र विक्रेत्यानी दै. सकाळ वर बहिष्कार टाकला.

दै. सकाळने हि मग माघार न घेता वितरणाची समांतर यंत्रणाच उभी केली. प्रथम नाव न घेता होत असलेल्या टीका नंतर वयक्तिक पातळीवर होऊ लागल्या. याचाच परिपाक म्हणून सकाळ कोल्हापूर आवृत्ती चे संपादक पद दस्तूर खुद्द अभिजीत पवारांकडे आले.

त्यांनी हातात कारभार घेतल्या-घेतल्या कोल्हापूरला विकासाच्या पहाटेची स्वप्न दाखवली. पण अजुनहि कोल्हापूरकर पहाटेची स्वप्न खरी होतात या गोष्टीवरच विश्वास ठेवून त्या विकासाची वाट पहात आहेत.

 
वास्तविक पाहता या वादाचा इतिहास फार जुना; मला वाटतं जेव्हा पासून दै. सकाळ न कोल्हापुरात पाय ठेवला तेव्हांपासून या वादाची ठिणगी पडली असावी, त्याच्या अगोदर दै. पुढारीची आणि त्यांच्या परीवाराचीच (सुज्ञ वाचकांना हा टोमणा निश्चितच समाजाला असावा) कोल्हापुरात मोनोपोली होती; त्याला सकाळने दिलेले आव्हान पुढारीला आवडले नसावे त्यामुळेच पुढारीचा पवारद्वेष आणि पर्यायाने राष्ट्रवादी द्वेष जन्माला आला.


पुढे काय झालं माहित नाही; पण साधारण ८-१० दिवसांनी तो वाद बहुधा थंड झाला. लोकांचे फुकट मनोरंजन करण्यापलीकडे यातून काही साध्य झालं असेल असं काही मला वाटत नाही. पण तब्बल एक-दीड वर्षांनी परत ह्या सध्याच्या बातम्यांनी हेच दाखवून दिले कि वाद जरी वरवर थंड झाला असला तरी आत कुठेतरी अजून ठिणगी धुमसते आहे.


आता पुढारी आणि सकाळ यात तुलना करायचीच झाली तर दोन्ही दैनिक वर्तमान पत्रे आहेत (आता सकाळ ने स्वयं घोषित भविष्य पत्राचा उदय केलाय हा भाग सोडून दया) हा एक मुद्दा सोडला तर साम्य असे काही नाहीच.

सकाळ खरे तर ब्राम्हणी ढंगाचे पुणेरी दैनिक; सौम्य भाषेतून आशयपूर्ण आणि सृजनशील लिखाण बुद्धीजीवी लोकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा असलेले; तर पुढारी म्हणजे अस्सल कोल्हापूरी चटपटीत भाषेत लोकांचे मनोरंजन करणारे दैनिक. दोन्ही दैनिकांचा वाचक वर्ग पूर्ण वेगळा पण तरीही त्यांच्या मधील हि इर्षा खरच अनाकलनीय आहे.

जाऊ दे आपल्याला काय करायचाय आपण तरी सकाळ आणि पुढारी दोन्ही पेपर रोज वाचतो तेहि इंटरनेट वर अगदी फुकटात; काय?  

           

Tuesday, 17 May 2011

शीला कि जवानी

गेल्या ५-६ महिन्यात मुन्नी आणि शीला या दोन नावांचा भलताच बोलबाला झाला. मुन्नीची बदनामी आणि शिलाची जवानी दोन्ही अगदी टॉपवर होत्या. त्यामुळ बाकीच काही नसलं तरी आपल्या देशात आम्बट शौकिनांची संख्या किती आहे हे तरी दिसून आलं. मध्यंतरी उत्तर प्रदेशातल्या दोन सख्ख्या बहिणी मुन्नी आणि शीला यांनी आपापली नावच या दोन गाण्यांच्या मूळ बदलून टाकली असही वाचनात आलं होत.

 आता यात किती खर किती खोट देवच जाणे; पण अशी गाणी जन-माणसावर किती परिणाम करतात याचा अनुभव मला नुकताच आला.

मध्यंतरी अस्मादिकांच्या लग्नासाठी आमच्या घरासमोर मांडव घातला होता; आणि मग काय गाणी-बजावणी हेहि आलच. आता मांडव, त्याला लायटिंग, आणि स्टेरिओवर गाणी त्यामुळं दररोज संध्याकाळी गल्लीतली सगळी शेंबडी पोरं आमच्या घरासमोर मांडवात नुसता धुडगूस घालायची. असच एक दिवस संध्याकाळी आमचे वडील पाहुण्यांच्या सोबत गप्पा मारत मांडवात बसले होते; नेहमीप्रमाणे गल्लीतल्या सगळ्या शेंबड्या पोरांनी स्टेरिओवरच्या गाण्यांच्यावर गणपती डान्स चालू केला होता. अशीच २-४ गाणी झाली असतील. सगळेजण त्या लहान पोरांचा निरागस दंगा अगदी कौतुकाने पाहत होते. एवढ्यात काय झाल गर्दीतन ३-४ वर्षांची दोन पोरं आमच्या वडिलांच्या जवळ आली; आणि म्हणतात काशी

अहो काका कसली गाणी लावलाय हि??? शीलाकी जवानी लावा कि जरा .......

आता ह्यास्नी स्वतःची XXX धुवायची अजून अक्कल नाही आणि ह्यास्नी शीलाकी जवानी पाहिजे. ह्याला काय म्हणावं आता तुमीच सांगा.

या प्रसंगाला १०-१२ दिवस झाले असतील नसतील; आमची सुट्टी अजून संपली नसल्यामुळ आम्ही कोल्हापुरातच होतो. आमच्या घरासमोर एक एकत्र कुटुंब आहे.

तिथलाच एक ५-६ वर्षाचा चुणचुणीत मुलगा; एक दिवस घरासमोरच्या रस्त्यावर मोठ-मोठ्यांनी गाणी म्हणत उभा होता

जाने दे शीला...... शीला कि जवानी.... आयम टू सेक्सी फॉर यु.......

एवढ्यात त्याची आई आतून आली आणि असले काय २-३ धप्पाटे त्याच्या पाठीत घातले म्हणता.... ते बिचार लागलं बोंबलायला. मला पण कळेना हेच्या आईला एवढं रागवायला नेमक काय झालं .......

आणि मग थोड्यावेळान लक्षात आलं त्या मुलाच्या आईचं नावच शीला होतं.


Thursday, 12 May 2011

हे आंदोलन-बिंदोलन राहू दे बाजूला आधी लग्न करा


 
मागच्याच आठवड्यात इंग्लंडच्या युवराजाच लग्न अगदी थाटामाटात पार पडलं; आख्खं लंडन रस्त्यावर उतरलं होत. टीवी वर त्या लग्नाच्या बातम्या झळकताना बघून मनांत सारखा एकच प्रश्न घोळत होता; आपल्याला असा दिवस कधी बघायला मिळणार?

आता नाही म्हणलं तरी तुमी आमच्या देशाचे युवराजच. त्यामुळ आमच्या सगळ्या आशा आता तुमच्यावरच आहेत. आमच्या देशाला काँग्रेस शिवाय आणि कॉंग्रेसला तुमच्या शिवाय हाय तरी कोण? आता तुमीच सांगा गेली साठ वर्षे तुमच्या ४-५ पिढ्या या देशावर राज्य करत आहेत; ते काय उगीच? मग भलेही त्याला पार बोफोर्स पासून कालच्या तुमच्या त्या २G पर्यंतची परंपरा असेना का; या देशातील जनता कधी तरी तुमच्या विरुध्द पेटून उठलिय का? हां; आता ४-५ राज्यात दुसऱ्या पक्षाच सरकार येत असेल हि पण केंद्रात तरी तुमाला सध्या तरी काय पर्याय नाही.

काही झाल तरी तुमच्या त्या खट्याळ नाठाळ काँग्रेसजनांना ताळ्यावर आणायला कुणीतरी गांधीच लागतोय. आता हेच बघा कि आम्ही एवढी मोठी मोठी माणस निवडून दिली; मंत्री-बिन्त्री केली पण ती सुध्धा तुमच्या पायताणाजवळ उभारत्यात; न्हव तुमच पायताण हातात घेऊन उभारत्यात. किती राव तुमच मोठ्पण!!
त्यामुळ काय बी होऊदे, तूमी काय बी काळजी करू नका; आमची गांधी घराण्यावरची निष्ठा आजिबात ढळणार नाही; भलेही मग आम्हाला आमच्याच देशात आमचाच तिरंगा फडकवल्या बद्दल गोळ्या खाव्या लागल्या तरी चालतील, किंवा मग महागाईन आमच कंबरड मोडलं तरी हरकत नाही आमचा फक्त आणि फक्त तुमच्यावरच विश्वास आहे.

आता तुमी चाळीशीत पोचला; आमच्या पिढीच एक ठीक आहे पण आमच्या पुढच्या पिढ्यांच आणि भारताचं कसं होणार? त्यावेळी देश चालवायला (नव्हे देशावर राज्य करायला) कुणी गांधी नको का? त्याची सोय आत्ताचं नको का करायला?

म्हणून म्हणतो आता हे आंदोलन-बिंदोलन राहू दे बाजूला स्वत:साठी नाही तरी निदान देशासाठी तरी आधी लग्न करा.

Tuesday, 3 May 2011

प्रेम, त्याग आणि संघर्षाला सलाम

नुकत्याच सकाळच्या मुक्तपीठ सदरातून डॉ. जिग्नेश ब. दोशी यांच्या जिवनावर आधारित प्रसिद्ध झालेली हि कथा.
चं द्रपूर जिल्ह्यातील लहानसे गाव - "कोलगाव.' आदिवासी वैदूच्या झोपडीत एका गोड सडपातळ पाच वर्षीय मुलीने प्रवेश केला. वडिलांच्या सांगण्यावरून टुनकन ती तुटक्‍या खर्चीवर बसली. वैदूबरोबर वडिलांनी मुलीच्या आजाराविषयी चर्चा केली. काही क्षणात वैदूने मुलीला जवळ बोलावले व तिचे हात धरायला लावून गरम त्रिकोणी लोखंडी सळईने पोटावरील सूज आलेल्या भागावर डाग दिला. निरागस मुलगी किंकाळ्या फोडत राहिली. वडिलांनीही तिच्या भल्यासाठी म्हणून मनावर दगड ठेवून ती शांत होईपर्यंत तिचे हात घट्ट धरून ठेवले. ही प्रक्रिया पुढील तीन आठवडे चालली. तिच्या पोटावरील ते व्रण बघून आजपण अंगावर काटा येतो. जन्मत: "सिकल सेल' नावाचा आनुवंशिक आजार असलेली ही सर्वसाधारण परिवारातील मुलगी. वैदूच्या चटक्‍यांपासून सहप्राचार्य डॉ. पूजा दोशी, रसायनशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ इथपर्यंतचा तिचा संघर्षपूर्ण प्रवास समाजापुढे प्रोत्साहनाचे एक उदाहरण आहे.

आज आयसीयूमध्ये मी पुन्हा एकदा तिची मृत्यूशी चाललेली झुंज पाहतो आहे. गेली वीस वर्षे प्रथम मित्र म्हणून व नंतर पती म्हणून तिच्या अशा किती तरी संघर्षपूर्ण दिवसांचा मी साथी व साक्षीदार आहे. "सिकल सेल क्रायसीस'मध्ये रुग्णाला असंख्य सुया टोचल्यासारख्या वेदना होतात व पूर्वस्थितीत येण्याकरिता कमीत कमी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. दहावीच्या वर्षात "क्रायसीस'मुळे तिच्या दोन्ही पायांना "हीप जॉइंट नेक्रोसीस'ने ग्रासले व आजपर्यंत पायाच्या मर्यादित हालचालींवरच ती आपले आयुष्य जगत आहे.

कॉलेजमध्ये प्रथम येणारी मुलगी किती तरी दिवस मधेमधे गायब का होते, हे कोडे उलगडल्यावर प्रतिस्पर्धी असूनसुद्धा मला तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. पुढे मैत्रीण व स्वाभाविकरीत्या माझा लग्नाचा प्रस्ताव; पण तिने स्पष्ट नकार दिला. स्वत:च्या आजारपणामुळे कुणाशीही लग्न करणार नाही, हा तिचा निर्धार मोडण्यास मला तब्बल सहा महिने लागले. बी.एस्सी.च्या प्रथम वर्षातच आमच्या प्रेमाचे फूल उमलले. बी.एस्सी. अंतिम वर्षाला जळगाव जिल्ह्यात उत्तम गुण मिळाल्याने आम्हा दोघांना पुणे विद्यापीठात "बायो केमिस्ट्री' विभागात प्रवेश मिळाला. पहिल्या दिवशी रेल्वेने शिवाजीनगरला उतरलो, तेव्हा मनापासून पुण्यनगरीला नतमस्तक झालो व तितक्‍याच आपुलकीने दोन्ही बाजू पसरवून या विद्येच्या माहेरघराने आम्हाला आपलेसे केले. त्या वेळी त्रास झाला, की मी तिला ससूनमध्ये भरती करायचो. डॉ. मृदुला फडकेंच्या उपचारानंतर पुन्हा अभ्यास सुरू. काही वेळेस न्यूमोनियामुळे परिस्थिती खूप वाईट झाली व रक्त चढवून व जवळ जवळ वीस दिवसांच्या उपचारानंतर ती बरी झाली. आम्हाला रसायनशास्त्र विभागाच्या सर्व शिक्षकांनी खूप प्रोत्साहन व साथ दिली. एक वेळ तर मला नेहमी तिच्या आजारामुळे त्रास होतो या गोष्टीला कंटाळून तिने एम.एस्सी. सोडण्याचा निर्णय घेतला व रेल्वे स्टेशनवरून तिला परत होस्टेलवर घेऊन जाणे मला खूप जड गेले.

लग्नाला घरातून विरोध अपेक्षित होता; पण आतापर्यंत आम्ही सोबत केलेल्या शैक्षणिक प्रगतीमुळे फार थोड्या विरोधानंतर दोन्ही परिवारांच्या आशीर्वादाने आमचे लग्न संपन्न झाले. मला लहान मुले खूप आवडतात व तिला आजारामुळे मूल होणे कठीण! एक दिवस "पापा मे पापा बन गया' हे गाणे बघताना मी ढसाढसा रडलो व ही गोष्ट तिने इतकी मनावर घेतली, की सर्व परिस्थिती माहीत असून मूल पाहिजे म्हणून हट्ट धरला. आठव्या महिन्यात तिला न्यूमोनियाने ग्रासले. परिस्थिती अतिनाजूक (सेप्टिसेमीया) अवस्थेपर्यंत गेली. सीझेरियन करून बाळ वाचले. आयसीयूमध्ये ती मला म्हणाली, "जिग्नेश, हे तुला माझे "गिफ्ट!' आजही ते शब्द माझ्या मनात स्पष्टपणे आठवतात.

डॉ. सरोदे मॅडम (डिन, मेडिकल कॉलेज, नागपूर) व त्यांच्या टीमने खूप प्रयत्न करून तिला वाचवले; पण त्या वेळी तिच्या स्प्लिनवर (स्वादुपिंड) कायमची इजा झाली.

तशी आमची जोडी बऱ्याच बाबतीत विसंगत. मी एक गुजराती नरमदिल; मुंगी मेली तरी उपवास करणारा माणूस व ती आयुष्यभर चटके व त्रास सहन केलेली जिद्दी व कणखर. मला लहानसहान दुखणे असले, की बायकोने दोन शब्द विचारावेत ही अपेक्षा कधीही पूर्ण झाली नाही. असले दुखणे तिच्यासाठी फार क्षुल्लक व त्यामुळे तिचे लक्ष वेधण्यास बराच ड्रामा केल्याशिवाय ती आपल्या कामातून डोके वर करील तर शपथ...!
आता तिने शिक्षण सोडावे व तब्येतीची काळजी घ्यावी, असा माझा मानस होता. पण तिने शिक्षणाआड आजाराला कधीच येऊ दिले नाही. पीएच.डी.च्या (डॉक्‍टरकीच्या) शेवटच्या टप्प्यात लहान मूल व तिला पित्ताशयाच्या खड्यांचा भयंकर त्रास. प्रत्येक आठवड्याला रात्री उशिरा रुग्णवाहिकेच्या आवाजाची शेजाऱ्यांना सवय झाली होती. पीएच.डी.चा शोधनिबंध संपल्यावरच तिने पित्ताशयाचे ऑपरेशन केले. पुढे द्राक्षावर संशोधन करण्यास डीबीटी पोस्ट डॉक्‍टरल शिष्यवृत्ती मिळवली व काळ्या द्राक्षातील डायबेटिसवरील औषधी तत्त्वावर संशोधन केले व ते आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित केले. सर्वांत आनंदाचा क्षण म्हणजे, तिने आतापर्यंत केलेल्या परिश्रमांचे फळ म्हणून तिला आमच्याच रसायनशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ येथे "सहायक प्राचार्य' म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली.

स्वत:च्या नाकावर ऑक्‍सिजनचा मास्क लावून मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या मदतीस धाव घेताना आपण क्वचितच बघतो. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये साधारणत: दहाव्या दिवशी बाजूच्या लहान बाळाची आई रडत आहे, हे बघून तिने मला तिची विचारपूस करण्यास सांगितले. गरीब आई दीड महिन्यापासून बाळाला बरे करण्यासाठी झटत आहे; डॉक्‍टरांचे बिल खूप वाढले आहे, हे कळल्यावर माझ्या हातातले तिच्या औषधासाठी आणलेले 25 हजार रुपये तिने तिला दिले. अशा प्रकारचे किती तरी अनुभव माझ्या स्मरणात आहेत.

आज वीस वर्षे झाली, आम्ही सोबत आहोत; पण अजूनपर्यंत तिच्या आत्मविश्‍वासाची सीमा मला कळली नाही. आज पण तिचे किती तरी नवीन पैलू डोळ्यांसमोर येतात व वाटते अजून तर ती मला अनोळखीच!... प्रेमभरल्या मनाने त्या अनोळखी साथीदाराचे घरात पुन्हा स्वागत करण्यासाठी मी हात पसरून उभा आहे. मला गरज आहे फक्त सर्वांच्या शुभेच्छांची...!!