Tuesday, 3 May 2011

प्रेम, त्याग आणि संघर्षाला सलाम

नुकत्याच सकाळच्या मुक्तपीठ सदरातून डॉ. जिग्नेश ब. दोशी यांच्या जिवनावर आधारित प्रसिद्ध झालेली हि कथा.
चं द्रपूर जिल्ह्यातील लहानसे गाव - "कोलगाव.' आदिवासी वैदूच्या झोपडीत एका गोड सडपातळ पाच वर्षीय मुलीने प्रवेश केला. वडिलांच्या सांगण्यावरून टुनकन ती तुटक्‍या खर्चीवर बसली. वैदूबरोबर वडिलांनी मुलीच्या आजाराविषयी चर्चा केली. काही क्षणात वैदूने मुलीला जवळ बोलावले व तिचे हात धरायला लावून गरम त्रिकोणी लोखंडी सळईने पोटावरील सूज आलेल्या भागावर डाग दिला. निरागस मुलगी किंकाळ्या फोडत राहिली. वडिलांनीही तिच्या भल्यासाठी म्हणून मनावर दगड ठेवून ती शांत होईपर्यंत तिचे हात घट्ट धरून ठेवले. ही प्रक्रिया पुढील तीन आठवडे चालली. तिच्या पोटावरील ते व्रण बघून आजपण अंगावर काटा येतो. जन्मत: "सिकल सेल' नावाचा आनुवंशिक आजार असलेली ही सर्वसाधारण परिवारातील मुलगी. वैदूच्या चटक्‍यांपासून सहप्राचार्य डॉ. पूजा दोशी, रसायनशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ इथपर्यंतचा तिचा संघर्षपूर्ण प्रवास समाजापुढे प्रोत्साहनाचे एक उदाहरण आहे.

आज आयसीयूमध्ये मी पुन्हा एकदा तिची मृत्यूशी चाललेली झुंज पाहतो आहे. गेली वीस वर्षे प्रथम मित्र म्हणून व नंतर पती म्हणून तिच्या अशा किती तरी संघर्षपूर्ण दिवसांचा मी साथी व साक्षीदार आहे. "सिकल सेल क्रायसीस'मध्ये रुग्णाला असंख्य सुया टोचल्यासारख्या वेदना होतात व पूर्वस्थितीत येण्याकरिता कमीत कमी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. दहावीच्या वर्षात "क्रायसीस'मुळे तिच्या दोन्ही पायांना "हीप जॉइंट नेक्रोसीस'ने ग्रासले व आजपर्यंत पायाच्या मर्यादित हालचालींवरच ती आपले आयुष्य जगत आहे.

कॉलेजमध्ये प्रथम येणारी मुलगी किती तरी दिवस मधेमधे गायब का होते, हे कोडे उलगडल्यावर प्रतिस्पर्धी असूनसुद्धा मला तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. पुढे मैत्रीण व स्वाभाविकरीत्या माझा लग्नाचा प्रस्ताव; पण तिने स्पष्ट नकार दिला. स्वत:च्या आजारपणामुळे कुणाशीही लग्न करणार नाही, हा तिचा निर्धार मोडण्यास मला तब्बल सहा महिने लागले. बी.एस्सी.च्या प्रथम वर्षातच आमच्या प्रेमाचे फूल उमलले. बी.एस्सी. अंतिम वर्षाला जळगाव जिल्ह्यात उत्तम गुण मिळाल्याने आम्हा दोघांना पुणे विद्यापीठात "बायो केमिस्ट्री' विभागात प्रवेश मिळाला. पहिल्या दिवशी रेल्वेने शिवाजीनगरला उतरलो, तेव्हा मनापासून पुण्यनगरीला नतमस्तक झालो व तितक्‍याच आपुलकीने दोन्ही बाजू पसरवून या विद्येच्या माहेरघराने आम्हाला आपलेसे केले. त्या वेळी त्रास झाला, की मी तिला ससूनमध्ये भरती करायचो. डॉ. मृदुला फडकेंच्या उपचारानंतर पुन्हा अभ्यास सुरू. काही वेळेस न्यूमोनियामुळे परिस्थिती खूप वाईट झाली व रक्त चढवून व जवळ जवळ वीस दिवसांच्या उपचारानंतर ती बरी झाली. आम्हाला रसायनशास्त्र विभागाच्या सर्व शिक्षकांनी खूप प्रोत्साहन व साथ दिली. एक वेळ तर मला नेहमी तिच्या आजारामुळे त्रास होतो या गोष्टीला कंटाळून तिने एम.एस्सी. सोडण्याचा निर्णय घेतला व रेल्वे स्टेशनवरून तिला परत होस्टेलवर घेऊन जाणे मला खूप जड गेले.

लग्नाला घरातून विरोध अपेक्षित होता; पण आतापर्यंत आम्ही सोबत केलेल्या शैक्षणिक प्रगतीमुळे फार थोड्या विरोधानंतर दोन्ही परिवारांच्या आशीर्वादाने आमचे लग्न संपन्न झाले. मला लहान मुले खूप आवडतात व तिला आजारामुळे मूल होणे कठीण! एक दिवस "पापा मे पापा बन गया' हे गाणे बघताना मी ढसाढसा रडलो व ही गोष्ट तिने इतकी मनावर घेतली, की सर्व परिस्थिती माहीत असून मूल पाहिजे म्हणून हट्ट धरला. आठव्या महिन्यात तिला न्यूमोनियाने ग्रासले. परिस्थिती अतिनाजूक (सेप्टिसेमीया) अवस्थेपर्यंत गेली. सीझेरियन करून बाळ वाचले. आयसीयूमध्ये ती मला म्हणाली, "जिग्नेश, हे तुला माझे "गिफ्ट!' आजही ते शब्द माझ्या मनात स्पष्टपणे आठवतात.

डॉ. सरोदे मॅडम (डिन, मेडिकल कॉलेज, नागपूर) व त्यांच्या टीमने खूप प्रयत्न करून तिला वाचवले; पण त्या वेळी तिच्या स्प्लिनवर (स्वादुपिंड) कायमची इजा झाली.

तशी आमची जोडी बऱ्याच बाबतीत विसंगत. मी एक गुजराती नरमदिल; मुंगी मेली तरी उपवास करणारा माणूस व ती आयुष्यभर चटके व त्रास सहन केलेली जिद्दी व कणखर. मला लहानसहान दुखणे असले, की बायकोने दोन शब्द विचारावेत ही अपेक्षा कधीही पूर्ण झाली नाही. असले दुखणे तिच्यासाठी फार क्षुल्लक व त्यामुळे तिचे लक्ष वेधण्यास बराच ड्रामा केल्याशिवाय ती आपल्या कामातून डोके वर करील तर शपथ...!
आता तिने शिक्षण सोडावे व तब्येतीची काळजी घ्यावी, असा माझा मानस होता. पण तिने शिक्षणाआड आजाराला कधीच येऊ दिले नाही. पीएच.डी.च्या (डॉक्‍टरकीच्या) शेवटच्या टप्प्यात लहान मूल व तिला पित्ताशयाच्या खड्यांचा भयंकर त्रास. प्रत्येक आठवड्याला रात्री उशिरा रुग्णवाहिकेच्या आवाजाची शेजाऱ्यांना सवय झाली होती. पीएच.डी.चा शोधनिबंध संपल्यावरच तिने पित्ताशयाचे ऑपरेशन केले. पुढे द्राक्षावर संशोधन करण्यास डीबीटी पोस्ट डॉक्‍टरल शिष्यवृत्ती मिळवली व काळ्या द्राक्षातील डायबेटिसवरील औषधी तत्त्वावर संशोधन केले व ते आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित केले. सर्वांत आनंदाचा क्षण म्हणजे, तिने आतापर्यंत केलेल्या परिश्रमांचे फळ म्हणून तिला आमच्याच रसायनशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ येथे "सहायक प्राचार्य' म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली.

स्वत:च्या नाकावर ऑक्‍सिजनचा मास्क लावून मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या मदतीस धाव घेताना आपण क्वचितच बघतो. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये साधारणत: दहाव्या दिवशी बाजूच्या लहान बाळाची आई रडत आहे, हे बघून तिने मला तिची विचारपूस करण्यास सांगितले. गरीब आई दीड महिन्यापासून बाळाला बरे करण्यासाठी झटत आहे; डॉक्‍टरांचे बिल खूप वाढले आहे, हे कळल्यावर माझ्या हातातले तिच्या औषधासाठी आणलेले 25 हजार रुपये तिने तिला दिले. अशा प्रकारचे किती तरी अनुभव माझ्या स्मरणात आहेत.

आज वीस वर्षे झाली, आम्ही सोबत आहोत; पण अजूनपर्यंत तिच्या आत्मविश्‍वासाची सीमा मला कळली नाही. आज पण तिचे किती तरी नवीन पैलू डोळ्यांसमोर येतात व वाटते अजून तर ती मला अनोळखीच!... प्रेमभरल्या मनाने त्या अनोळखी साथीदाराचे घरात पुन्हा स्वागत करण्यासाठी मी हात पसरून उभा आहे. मला गरज आहे फक्त सर्वांच्या शुभेच्छांची...!!

No comments:

Post a comment