Wednesday, 22 June 2011

मराठा समाज आणि आरक्षण


दर दोन-चार महिन्यानी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पेपर मधून झळकत असते. आता यावेळी काय तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर एकाही मराठा उमेदवाराला मत देणार नाहीम्हणजे उद्या बिगर मराठा नेते मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील याची ग्यारंटी आहे का? आणि मी म्हणतो आम्हाला आरक्षणाची गरजच काय? आत्तापर्यंत आम्ही स्वतःच्या जातीचा स्वाभिमान बाळगून जगत आलो; आम्ही शिवबाचे वंशज म्हणून मिरवत आलो. आणि त्या विलक्षण श्रीमंत इतिहासाचे, शौर्याचे, पराक्रमाचे बाळकडू आम्हाला मिळाले असताना स्वतःला अविकसित म्हणवून घ्यायचं कारणच काय?हां; आता मराठा समाजातहि काही घटक दुर्बल असतील किंबहुना आहेतच तसे ते इतर सर्व जाती-धर्मात सुध्धा आहेत. अशा दुर्बल घटकांच्या विकासासाठी आर्थिक निकषावर आधारित आरक्षण ठेवायला काहीच हरकत नाही. आणि मराठा समाजातील लोकांनी त्याचा लाभ घेण्यात सुध्धा मला काही वावगे वाटत नाही.पण संपूर्ण मराठा समाजाला जातीनुसार आरक्षण मागणे मला खेदजनक वाटते. अरे ज्या जातीत शिवबा-शंभूराजांसारखे युगपुरुष झाले, ज्या मावळ्यांच्या पराक्रमाने आम्हास वाघिणीचे दुध पाजले त्यांचे वंशज आम्ही नेभळटासारखे आरक्षण काय मागतो.कुठे गेली ती आमच्या मनगटातली ताकद आणि काळ्या कातळाला धडक देण्याची जिद्द. का आपण आपली ताकद लुटूपुटूची पोस्टर युद्धे खेळण्यात वाया घालवतोय? का आपले पराक्रम शौर्य एखादया राजकीय पक्षाच्या वळचणीला गहाण टाकतोय?एक लक्षात ठेवा या आरक्षणाच्या कुबड्या देऊन आपण पुढच्या पिढ्यांना लंगड बनवतोय. त्यांच अंगातल लढण्याच बळच काढून घेतोय; अशान एक दिवस ते आपला लढाऊ बाणाच विसरून जातील. लक्षात ठेवा जाती साठी माती खाण्याची शिकवण देणाऱ्या शिवबा-शंभूराजांना असला नेभळट समाज नक्कीच अपेक्षित नव्हता.त्यामुळ काही करायचच असेल तर प्रगतीच्या आड येणाऱ्या संकटाशी सामना करा; परिस्थिती विरुध्द लढा. गल्लीच्या कोपऱ्यावर कट्ट्यावर बसून आपापसात भांडण्यात काहीच मर्दुमकी नाही. आपल्या इतिहासाला शोभेल आणि पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल अस काही तरी भव्य-दिव्य करण्याची आस मनी बाळगा. आरक्षणाच्या कुबड्या फेकून दया.बोला || जय शिवाजी || जय भवानी || हर हर महादेव ||

5 comments:

 1. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आता तरी थंडावली आहे. विचार चांगले आहेत. प्रत्येक मराठा तरुणाने असा विचार करायला हवा.

  ReplyDelete
 2. युवराज..
  लेख सुंदर झाला आहे.एका मोठ्या विषयास ,नेमक्या नि स्पष्ट शब्दात हात घातल्या बद्दल अभिनंदन.

  साधारण वीसएक वर्षा पूर्वी ह्या विषयाच्या अनुषंगाने विखे पाटील (सिनियर)ह्यांनी दैनिक लोकसत्ताच्या एका रविवारच्या पुरवणीत एक संपूर्ण पान भर लेख लिहिला होता.सदरहू लेख हा एकूणच मराठा समाजाच्या,खास करून त्या वेळच्या तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा होता,जो स्वाभाविकपणे तेव्हा सर्वांना फारच झोंबला होता.अगदी आपल्या शरद पवारां सकट.इतका कि ह्या लेखावर त्या वेळी पुढील महिना दीड महिना खूप खल झाला नि शेवटी खुद्द शरद पवार ह्यांना त्या लेखास प्रती उत्तर द्यायची वेळ आली नि त्यांनी हि ह्या विषयावर एक लेख लिहिला होता तो हि लोकसत्ताने त्या वेळी प्रसिद्ध केला होता.आजची मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पाहता,विखे पाटलांचे त्या वेळचे "भाकीत" १०० टक्के सत्यात उतरले आहे,हे अतिशय खेदाने सांगावेसे वाटते.
  आज पासून २०-२५ वर्षा पूर्वी ब्राह्मणेतर समाजातील एकूणच शिक्षणाचे प्रमाण,दृक श्राव्य मीडियाची ताकद,हिंदू-हिंदू मधील जातीपातीचे राजकारण,भेदाभेद हा अतिशय नगण्य होता.अन खरे तर मराठा समाजा प्रती असलेल्या केवळ खऱ्या आस्थे मुळेच त्या काळी,विखे पाटील आपले विचार अतिशय स्पष्ट पणे अन निर्भीड पणे मांडू शकले.पण दुर्दैवाने तो संदेश मराठा समाजातील त्या वेळच्या तरुणां पर्यंत तो पोहोचू शकला नाही हि वास्तवता आहे.आजच्या काळात मराठा समाजातील कुठला हि नेता सदरहू विषयावर त्या प्रकारचा लेख तर सोडून द्या पण नुसते तसे बोलला तरी मराठा समाजातील लोक त्याचे प्रथम डोके नि नंतर त्याचे घरदार ...अगदी ऑफिस सुद्धा फोडतील...
  हि सगळी आठवण करून द्यायचे कारण कि आजच्या काळात, आपल्या एकूणच मराठा समाजा प्रती प्रचंड कळवळा असणाऱ्या,निदान तसे भासविणाऱ्या आजच्या मराठा समाजातील सर्व नेत्यांनी तो लेख खरे तर लोकसत्ता मधून मिळवून त्याचे सामुहिक वाचन केले पाहिजे,नि थोड्या थोडक्या नव्हे तर वीस पंचवीस वर्षा पूर्वीच त्यांच्याच एका नेत्याने "आज" मराठा समाजाने वेळीच आत्म परीक्षण केले नाही तर त्यांच्या पुढील पिढीस कोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल" हे सोदाहरण केलेले भाकीत,त्याची कारणे नि त्या वरचे सदरहू लेखातच केलेले उपाय नियोजन हे निदान एकदा तरी नजरे खालून घालावे असे प्रेमाचे सांगणे आहे.
  निसर्गाच्या नियमास धरून म्हणजेच "the fittest will survive ... only " ह्या दृष्टीने बघितले नि विचार केला तर मोठ्या झाडाच्या (आरक्षणाच्या) सावलीत, छोट्या झाडाचे कधीच डेरेदार वृक्षात परिवर्तन होऊ शकत नाही ... शकणार नाही हि वास्तवता आहे.त्या मुळे कोण काय म्हणत नि काय आश्वासने देत ह्या पेक्षा वास्तवता नि भविष्य काय आहे...हा आपण लेखात मांडलेला विचार मनास भावून गेला नि केवळ मराठा समाजा प्रती असणाऱ्या प्रेमामुळेच हा सविस्तर पंक्ती प्रपंच. धन्यवाद.

  ReplyDelete
 3. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. मी लेखात फक्त माझ्या मनातील भावना प्रकट केल्या पण आपली प्रतिक्रिया खरोखरच अभ्यासपूर्ण आहे. मलाही तो लोकसत्ता मधील लेख वाचायला आवडेल.

  ReplyDelete
 4. मी एक सर्वसामान्य घरातील तरुण मराठा आहे . पण मला सर्व थरातील मराठा समाजाचे हित बघायचे आहे.तसेच शिवाजी महाराजांचे अनुयाही आहोत तर प्रथम चांगले काय आणि
  चुकीचे काय हे पाहिले पाहिजे.जात, धर्मानुसार चांगले काय आणि चुकीचे काय ठरवू नये.तसेच दुर्बल घटकांच्या विकासासाठी आर्थिक निकषावर आधारित आरक्षण ठेवायला
  काहीच हरकत नाही व मराठा समाजाला किवा अन्य समाजाला आराक्षनाची गरज सुधा नाही.
  || जय शिवाजी || जय भवानी || हर हर महादेव ||

  ReplyDelete
 5. 100 % agreed ...

  ani mala pan vikhe-patil yancha lekh vachayla avadel..

  ReplyDelete