Sunday, 11 March 2012

आज ‘संकष्टी’


महिन्यातून एकदाच येणारा हा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उपवास आपल्यातले बरेच लोक पाळतात. किंवा कटाक्षाने लक्षात ठेऊन निदान त्यादिवशी सामिष आहार तरी जरूर टाळतात.

मी सुद्धा बऱ्याच वर्षांपासून नियमित संकष्टीचा उपवास करत आलो आहे. पण याला नक्की काय म्हणायचं? संकष्टी की चतुर्थीकॅलेन्डरमध्ये संकष्ट चतुर्थी असा पूर्ण उल्लेख असतो. पण बोली भाषेत काही लोक याला नुसते संकष्टी किंवा नुसतेच चतुर्थी म्हणतात.

आमच्या घरी किंवा आजूबाजूला संकष्टी असे म्हणायची पद्धत आहे, पण पुण्यात आल्यानंतर मला या दिवसाला चतुर्थी देखील म्हणतात असे कळाले.

पूर्वीपासून पडलेले प्रघात म्हणून दोन्ही संबोधने बरोबर आहेत. पण प्रश्न असा आहे की आपण प्रत्येक चतुर्थी पाळतो का? तर नाही.

प्रत्येक मराठी महिन्यात दोन चतुर्थ्या येतात; एक येते शुक्ल पंधरवड्यात आणि दुसरी येते ती कृष्ण पंधरवड्यात. आणि कृष्ण पंधरवड्यात जी चतुर्थी येते तिलाच आपण संकष्ट चतुर्थी असे म्हणतो. म्हणजे शुक्ल पंधरवड्यात असते ती नुसतीच चतुर्थी (अपवाद भाद्रपद महिन्यातील शुक्ल पंधरवड्यातील चतुर्थीचा; ज्या दिवशी आपल्या गणपतीबाप्पाचे आगमन होते ती गणेश चतुर्थी) आणि प्रत्येक महिन्यात कृष्ण पंधरवड्यात येणारी ती असते संकष्ट चतुर्थी.

थोडक्यात काय? तर प्रत्येक महिन्यात जरी दोन चतुर्थ्या येत असल्या तरी त्यापैकी एकच संकष्ट चतुर्थी असते म्हणून तिला चतुर्थी म्हणून ओळखण्यापेक्षा संकष्टी म्हणून ओळखणेच जास्त बरोबर होईल नाही का?

Wednesday, 7 March 2012

म्हणूनच म्हणतो चला लेट्स सेलिब्रेट !!!!


लहानपणी जेवढी एखाद्या सणाबद्दल उत्सुकता असायची किंवा एकूणच जेवढी मज्जा यायची तेवढी आता वाटत नाही. तुम्हाला सुध्धा असच वाटत का?
हे अस कशामुळं असाव? मोठ झालं की आपल्या जाणीवा बोथट होतात म्हणून? की आताशा प्रत्येक सणाला शाळेमधल्या सारखी सुट्टी मिळत नाही म्हणून? हे ही एक कारण असावच बहुतेक; कारण बाकी काही नसलं तरी एखाद्या सणाला सुट्टी असेल तर निदान त्या सणाचा फील तरी येत राहतो.
पण एकूणच पाहिलं तरी पूर्वीच्या काळी सणांचे जेवढे महत्व असायचे तेवढे आताशा नक्कीच राहिलेलं नाही. कारण पूर्वीच्या काळी माणूस निसर्गाच्या फार जवळ होता, त्यामुळ रंगपंचमी, पाणीपंचमी यांच्यामुळे शरीराला मिळणारा गारवा त्यावेळी आवश्यक असायचा, आता सगळा दिवस ऑफिसच्या ए. सी. मध्ये बसणाऱ्याला अशा गारव्याची काय गरज. तसच काहीस दिवाळी, संक्रात यासारख्या सणांचं. तुम्ही सांगा आज-काल फक्त दिवाळीलाच केल्या जाणाऱ्या फराळाच कुणाला काही अप्रूप राहिलय का?
दिवाळीचा फराळ बनवण हे सुध्धा पूर्वी किती थ्रिलिंग असायचं, डाळी, तांदूळ दळून आणण्यापासून तयारी असायची. आताशा घरच्या बायकादेखील एवढं लक्ष देताना दिसतात या गोष्टीत.
एकूण काय आज-काल सणांचे धार्मिक म्हणा, वैज्ञानिक म्हणा नाहीतर सांस्कृतिक, सामाजिक काही म्हणा असले काही उद्देश सोडून निव्वळ सेलिब्रेशन हा एकमेव उद्देश राहिलेला आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
पण तरीसुध्धा सेलिब्रेशनच्या निमित्ताने का होईना आपण थोड्याफार चालीरीती जपतो, त्यामळे परंपरा जपली जाते, कालौघात सणांचे पूर्वीचे उद्देश जरी पुसले जात असले तरी हे सण पूर्वी का साजरे केले जात होते निदान हे तरी आपल्या लक्षात राहील.
आणि म्हणूनच म्हणतो चला लेट्स सेलिब्रेट !!!! HAPPY HOLI….