Sunday, 11 March 2012

आज ‘संकष्टी’


महिन्यातून एकदाच येणारा हा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उपवास आपल्यातले बरेच लोक पाळतात. किंवा कटाक्षाने लक्षात ठेऊन निदान त्यादिवशी सामिष आहार तरी जरूर टाळतात.

मी सुद्धा बऱ्याच वर्षांपासून नियमित संकष्टीचा उपवास करत आलो आहे. पण याला नक्की काय म्हणायचं? संकष्टी की चतुर्थीकॅलेन्डरमध्ये संकष्ट चतुर्थी असा पूर्ण उल्लेख असतो. पण बोली भाषेत काही लोक याला नुसते संकष्टी किंवा नुसतेच चतुर्थी म्हणतात.

आमच्या घरी किंवा आजूबाजूला संकष्टी असे म्हणायची पद्धत आहे, पण पुण्यात आल्यानंतर मला या दिवसाला चतुर्थी देखील म्हणतात असे कळाले.

पूर्वीपासून पडलेले प्रघात म्हणून दोन्ही संबोधने बरोबर आहेत. पण प्रश्न असा आहे की आपण प्रत्येक चतुर्थी पाळतो का? तर नाही.

प्रत्येक मराठी महिन्यात दोन चतुर्थ्या येतात; एक येते शुक्ल पंधरवड्यात आणि दुसरी येते ती कृष्ण पंधरवड्यात. आणि कृष्ण पंधरवड्यात जी चतुर्थी येते तिलाच आपण संकष्ट चतुर्थी असे म्हणतो. म्हणजे शुक्ल पंधरवड्यात असते ती नुसतीच चतुर्थी (अपवाद भाद्रपद महिन्यातील शुक्ल पंधरवड्यातील चतुर्थीचा; ज्या दिवशी आपल्या गणपतीबाप्पाचे आगमन होते ती गणेश चतुर्थी) आणि प्रत्येक महिन्यात कृष्ण पंधरवड्यात येणारी ती असते संकष्ट चतुर्थी.

थोडक्यात काय? तर प्रत्येक महिन्यात जरी दोन चतुर्थ्या येत असल्या तरी त्यापैकी एकच संकष्ट चतुर्थी असते म्हणून तिला चतुर्थी म्हणून ओळखण्यापेक्षा संकष्टी म्हणून ओळखणेच जास्त बरोबर होईल नाही का?

No comments:

Post a comment