Wednesday, 22 August 2012

मनसेची धर्मनिरपेक्षता कॉंगेसच्या पथ्यावर

मुंबईच्या आझाद मैदानावर "रझा अकादमीच्या" सभेदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा निषेध म्हणून मनसेने काढलेला मोर्चा आणि त्यानंतरची राज साहेबांची सभा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात फार गाजली. सामान्य नागरिकांचा सुद्धा खूपच चांगला प्रतिसाद याला मिळाला.
 
राज साहेबांच्या या वेळच्या कृतीला मिळालेल्या सामान्य जनतेच्या पाठिंब्याला अनेक कंगोरे आहेत. सरकारच्या बोटचेपी धोरणांबद्दल जनतेच्या मनात असणारा असंतोष, 'रझा अकादमीच्या' कृत्त्याला प्रत्त्युत्तर देण्याची भावना असेल किंवा मग 'राज' साहेब म्हणतात त्याप्रमाणे पोलीस व मिडीयाला पाठींबा देण्याची भावना असेल.
पण दुसऱ्या बाजूने विचार करता आणि मागील काही महिन्यातील घडामोडीचा विचार करता माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या.....
 
१. राज साहेबांचा कालचा मोर्चा व साभेदरम्यानचा पवित्रा हा नेहमीप्रमाणे आक्रमक नव्हता. त्यांनी स्वतः या मोर्च्यामागील 'हिंदुत्ववादी' उद्देशाचा साफ शब्दात इन्कार केला. मनसे कार्यकर्त्यांनी देखील कोणतीही हुल्लडबाजी न करता अतिशय शिस्तबद्ध पद्दतीने सारा कार्यक्रम पार पाडला.
त्यामुळे झाला काय कि; लोकांच्या मनात दबलेल्या भावनांना अतिशय सुरक्षित पद्धतीने वाट मिळाली, आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला एक प्रकारे मदतच झाली.
 
२.   राज साहेबांच्या मोर्च्याला पोलिसांची परवानगी नव्हती, किंबहुना सभा घेण्यासाठी देखील पहिल्यांदा परवानगी नव्हती पण मा. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशी नंतर गृह विभागाने सभेला परवानगी दिली. या सर्व घडमोडीदरम्यान राज साहेबांनी मुख्यमंत्री किंवा कॉंग्रेस विरुद्ध कोणतेही भाष्य केले नाही पण आर. आर आबांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे.
 
गेल्या काही महिन्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या दरम्यान चाललेली धुसफूस लक्षात घेता राष्ट्रवादीला विरोधकांकडून टार्गेट केले जाणे हे कॉंग्रेसच्या दृष्टीने हितकरच आहे. पुढील २०१४ च्या निवडणुकीच्या समीकरणाचा विचार करता एक लक्षात येईल कि कोणताही पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही.
जनतादेखील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या या 'जोडगोळीला' वैतागली आहे त्यामुळे सत्तापालट होणार हे जवळ-जवळ निश्चित आहे. 'मनसेच्या' अस्तीत्वामुळे पण फक्त शिवसेना-भाजप आघाडीला सत्तेत येणे अशक्यप्राय होत आहे. आणि मनसे परत जाऊन शिवसेना-भाजप आघाडीला मिळाला तर हे सगळे एकाच माळेचे मनी होतील आणि मग शिवसेना- मनसे मध्ये काहीच फरक राहणार नाही.
आणि त्याचमुळे मनसेचे "धर्मनिरपेक्ष" राहणे कॉंग्रेसला अधिक फायद्याचे आहे कारण; त्यामुळे राष्ट्रवादिसारख्या डोईजड होणारया पक्षाला 'फाट्यावर'
 
मनसे सारख्या "धर्मनिरपेक्ष" पक्षा बरोबर आघाडी करण्याचा पर्याय कॉंग्रेस साठी खुला राहणार आहे.
कारण कुणीतरी म्हटलेलंच आहे "राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो". आता हि कॉंग्रेस-मनसे आघाडी होईल कि नाही हे येणारा काळच ठरवेल पण तोपर्यंत माझं आपला असाच चर्वित-चर्वण.........