Tuesday, 9 October 2012

लता दीदी It's Not Done !!!!

प्रिय लता दीदी, 

आपण भारतातीलच नव्हे तर जगभरातील तमाम कानसेनांच्या गळ्यातील ताईत आहात. संगीत क्षेत्रात आपले नाव व कामगिरी अजरामर आहे. अखंड भारत वर्षात आपले नाव फार आदराने घेतले जाते. त्यामुळे आपण मराठी/ महाराष्ट्रीय असल्याचा आम्हास खचितच अभिमान आहे.

आपल्या संगीत क्षेत्रातील कामगिरीचा श्रीगणेशा मराठी सिने-सृष्टीतून किंबहुना कोल्हापुरातून झाला हे सर्वश्रुत आहे. भलेही आपण आज जी उंची गाठली आहे त्यात कोल्हापूरचा, कोल्हापुरकरांचा अथवा मराठी चित्रपट सृष्टीचा वाटा काहीच नसेल; आम्हास मान्य आहे कि आपण आपल्या प्रतिभेच्या आणि कष्टांच्या जोरावरच आजचे हे स्थान मिळवले आहे त्यात काही शंका नाही.

पण आज आपले जे उच्च स्थान आहे जो आदर आहे, त्याचा उपयोग आपण मराठी सिनेमाच्या विकासासाठी करणे आवश्यक आहे. किंबहुना आपण अधिकारवाणीने चित्रपट व्यावसायिकांना, शासकीय यंत्रणेला खडे बोल सुनावून त्यांच्या कडून काम करून घेतले पाहिजे अशी आमची अपेक्षा होती. तेवढा आपला अधिकारच आहे.तुमच्या बाजूने विचार करता आपल्या वयामुळे किंवा इतर कारणांमुळे आपणास असे कार्य करणे शक्य नसेल तरीही हरकत नाही. 

पण आज महाराष्ट्रभर गाजणाऱ्या "जयप्रभा स्टुडीओ" च्या प्रश्नावर आपण घेतलेली तद्दन व्यावसायिक भूमिका खरोखरच आक्षेपार्ह आहे; आपल्या जन-माणसातील प्रतिमेला तडा जाणारी आहे.भलेही आज तो स्टुडीओ व भोवतालची जागा कायदेशीर रित्या आपल्या नावावर असेल; पण त्याबद्दलची कोल्हापुरकरांची भावना आणि त्या जागेचे महत्व लक्षात घेता त्याजागेवर आज जरी (आपण म्हणत असल्याप्रमाणे) चित्रपटांचे शुटींग करणे परवडणारे नसले तर खचितच विधायक दृष्टीकोनातून त्या जागेचा वापर होऊ शकतो.

आपण आज जो १६ कोटी रुपयांसाठी हि जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीचे नुकसान होईलच पण आपले जनमानसातील स्थान सुध्धा शिल्लक राहणार नाही. 

(काही वर्षापूर्वी सामान्य लोकांच्या सोयीचा विचार न करता आपल्या मुंबईतील घराशेजारून जाणाऱ्या उड्डाणपुलाला मंगेशकर कुटुंबीयांनी केलेला विरोध अजून जनतेच्या लक्षात आहेच)

बिल्डर काय त्या जागेच्या प्रसिध्धीचा पुरेपूर वापर करून तुम्हाला दिलेल्या १६ कोटींच्या बदल्यात १६० कोटी कमावतील

आजच्या घडीला गरज आहे ती आपण, आपले सल्लागार कोल्हापूरचे प्रसिध्ध गायक सुरेश वाडकर व इतर यांनी सामान्य जनतेच्या मतांचा आदर करण्याची; कुणीतरी म्हणून ठेवलेलच आहे "जो स्वतःसाठी जगला तो संपला; जो दुसर्यांसाठी मेला तोच जगला" आणखी काय बोलू आपण सुज्ञ आहा.


संदर्भ: http://online2.esakal.com/esakal/20121009/5441226520793644658.htm